सोलापूर : विधानसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही शेतकरी कर्जमाफी दिली नाही. तसेच दिव्यांगांच्या प्रश्नाकडे डोळेझाक होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडूप्रणित प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात भाजपचे माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर अनोख्या पद्धतीने ‘मशाल’ आंदोलन केले.

होटगी रस्त्यावर आमदार सुभाष देशमुख यांचे निवासस्थान आहे. याच रस्त्यावरील महिला हॉस्पिटल येथून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार देशमुख यांच्या निवासस्थानापर्यंत चालत जाऊन तेथे मशाल आंदोलन केले. मशालीं पेटवून त्यांच्या लखलखत्या प्रकाशात प्रहार संघटनेने लक्षवेधी आंदोलन केले. संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख, जिल्हाप्रमुख दत्ता मस्के-पाटील, माजी नगरसेवक सय्यद बाबा मिस्त्री यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मनोहर दोंतूल, निरंजन ख्याडे, फिरोज सय्यद, मोहसीन खान, ट्राफिक इनामदार, फैसल सालार आदींचा या आंदोलनात सहभाग होता.

शेतकरी कर्जमाफीसह पीक पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च एमआरईजीएस योजनेतून द्यावा, दिव्यांग व्यक्तींना दरमहा सहा हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी शासनावर दबाव आणावा आणि विधानसभेत आवाज उठवावा म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे जमीर शेख यांनी सांगितले.