सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात महाकाय उजनी धरण असूनही शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून उजनी धरणातील पाणी वाटप सत्ताधारी मंडळींनी मनमानी केल्यामुळे नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचा गांभीर्याने विचार करून उजनीच्या पाणी वाटपाला शिस्त लावण्याबरोबरच जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी वाढविण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रथमच सोलापुरात येऊन निवडक प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न सोडवून सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून आपली वाटचाल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात आपल्यासह खासदार प्रणिती शिंदे आणि शेजारच्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे एकाच विचारांचे असल्यामुळे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा आदर्श समोर ठेऊन कोणतेही राजकारण न करता नक्कीच विकासाचा दृष्टिकोन बाळगून विधायक काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा – सातारा जिल्हा रुग्णालयात दूध बँक होणार, सुदृढ पिढीसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार
ते म्हणाले, जिल्ह्यात शेतीमाल प्रक्रिय उद्योग वाढीसाठी आपला विशेष भर राहणार असून प्रत्येक तालुक्यात छोट्या आकाराच्या औद्योगिक वसाहती उभारण्याची संकल्पना आहे. या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या डाळिंब, द्राक्षे, केळी, पेरू, सीताफळ यासारख्या फळांवर प्रक्रिया उद्योगांची निर्मिती होईल आणि त्यातून रोजगार वाढेल, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.