सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ कंटेनर, मिनीबस आणि दुचाकीच्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकीस्वारासह बसचालक आणि बसमधील महिला अशा तिघा जणांचा मृत्यू झाला. तर अन्य १५ भाविक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जागेवर न थांबता कंटेनरचालकाने पलायन केले असून त्याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुसगाव येथील १६ महिला मुलाबाळांसह मिनीबसमध्ये (एमएच १२ केक्यू ११७५) बसून अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूरच्या देवदर्शनासाठी आल्या होत्या. तुळजापूर आणि अक्कलकोटचे देवदर्शन आटोपून या सर्वजणी सोलापूर-पुणे महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने जात होत्या. वाटेत मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटीजवळ एका दुचाकीस्वाराला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर ट्रकने (एनएल ०१ एए ७२०५) ठोकरले आणि त्या पाठोपाठ पुढील मिनीबसला मध्यभागी जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दयानंद सदा भोसले (वय ३४, रा. लांबोटी, ता. मोहोळ) याच्यासह बसचालक लक्ष्मण बासू पवार आणि बसमधील प्रवासी महिला सपना रमेश मोहिते (वय ४०, रा. कुसगाव, ता. भोर) या तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात तेजस्विनी मयूर पांढरे (वय २०), प्राची पांडुरंग पांढरे (वय ३४), छाया रतन शेंडगे (वय ३५), रेखा दत्तात्रय चौधरी (वय ३३), कोमल अनिल जोरकर (वय ३२), भक्ती पांडुरंग मांढरे (वय १६), बेबी सुधाकर गायकवाड (वय ३४), अनिता शंकर बारगे (वय ४२), संगीता रवींद्र शेंडगे (वय ३२), कोमल सचिन पांढरे (वय २१), रेशमा नितीन चौधरी (वय ३५), सोनाली रमेश आडुळकर (वय ३१), अरव अरुण खाडे (वय १६), परी अनिल जोरकर (वय ११) आणि सई मांढरे (वय ९) असे १५ जण जखमी झाले. त्यांच्यावर मोहोळ आणि सोलापूरच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले जात आहेत.

Story img Loader