सार्वजनिक शौचालयात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल नरेश जनार्दन कोंडा (२१) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दोषी धरून १२ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी नरेश कोंडा याच्या घराजवळ राहणारी आणि त्याच्या ओळखीची असलेली पीडित मतिमंद मुलगी २० जानेवारी २०२१ रोजी घराजवळील सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेली होती. ती मंतिमंद असल्याचे माहीत असून देखील आरोपी नरेश याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर धमकीही दिली होती. त्याची वाच्यता होताच पीडित मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार आरोपी नरेश कोंडा याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी १३ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी व पीडित मुलीसह तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीति टिपरे, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. घटनास्थळाचा पंचनामा, मानसोपचार तज्ज्ञाने पीडित मुलगी मतिमंद असल्याचा दिलेला निर्वाळा, पीडित मुलीच्या डीएनए चाचणीचा अहवाल, पीडित मुलगी व आरोपीच्या कपड्यांवर आलेले डाग आदी मुद्द्यांवर ॲड. राजपूत यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. आरोपीतर्फे ॲड. दीपक सुरवसे व ॲड. दिलीप जगताप यांनी काम पाहिले.