सोलापूर : ओळखीच्या माध्यमातून एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीशी सलगी करून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याबद्दल पाच रिक्षाचालकांसह आठ जणांना दुहेरी जन्मठेप, तर अन्य तिघा आरोपींना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन श्रीकांत राठोड (वय २४), प्रवीण श्रीकांत राठोड (वय २२), गणेश ऊर्फ अक्षय विष्णू चव्हाण (वय २२, तिघे रा. प्रतापनगर लमाण तांडा, विजापूर रोड, सोलापूर), करण विजयकांत भरले (वय १९, रा. सोरेगाव, सोलापूर), गौरव विलास भोसले (वय ३०, रा. निराळे वस्ती, मुरारजी पेठ, सोलापूर) या सर्व रिक्षाचालकांसह राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई (वय ३३, रा. एसटी कॉलनी, नवीन आरटीओजवळ, सोलापूर), दिनेश परशु राठोड (वय १९), सतीश अशोक जाधव (वय ३०), रोहित श्याम राठोड (रा. प्रतापनगर लमाण तांडा, सोलापूर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी सचिन राठोड, राज ऊर्फ राजकुमार देसाई आणि गौरव भोसले यांना प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली, तर अन्य आठ आरोपींना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.

हेही वाचा : Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”

या खटल्यातील पीडित अल्पवयीन मुलगी मागासवर्गीय समाजाची असून, ती ऑगस्ट २०१९पासून सोलापुरात एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असताना तिच्याशी रिक्षाचालक आरोपी सचिन राठोड याची ओळख झाली होती. नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यातूनच त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीला एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले होते. असे प्रकार दोन-तीन वेळा झाल्यानंतर त्यात आरोपी सचिन राठोड याचे अन्य साथीदार सहभागी झाले. जुळे सोलापुरात तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर सर्व आरोपी पुन्हा चटावले होते. त्यातून शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडित मुलीने आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली. तिच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह बाललैंगिक शोषण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्यानंतर सर्व आरोपी कर्नाटकात लपून बसले होते. शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन सखोल तपासाचा आदेश दिला होता. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी तपास केला.

हेही वाचा : ‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका

या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी ३८ साक्षीदारांची तपासणी केली. यात पीडित मुलीसह तिची आई, वैद्यकीय अधिकारी, पोलीस तपास अधिकारी आदींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपींतर्फे नागराज शिंदे, इस्माईल शेख, सुरेश चव्हाण, एस. एम. झुरळे, फिरोज शेख या वकिलांनी बाजू मांडली..जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur rape case life imprisonment to 8 accused who raped minor girl css