सोलापूर : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ घेऊन येणाऱ्या लाखो वारकरी तथा भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुलभ होण्याच्या दृष्टीने दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १०२ कोटी ७४ लाख रुपये किंमतीच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, ही निविदा वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार आणि तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. पंढरपुरात या दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीचे काम पावसाळ्याचा कालावधी गृहीत धरून दोन वर्षांत पूर्ण होणार, असे सांगितले जात होते. ही निविदा गेल्या ८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी असलेल्या व्यवस्थेचा पुनर्विकास करण्याच्या अनुषंगाने १२९ कोटी दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपये किमतीच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यानुसार शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पंढरपूर) दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारणीकरिता १०२ कोटी ७३ लाख ९५ हजार ८८४ रुपये किंमतीची निविदा प्रसिद्ध केली होती.

या अल्पमुदतीच्या निविदेनुसार पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकरिता उभारल्या जाणाऱ्या दर्शन मंडप व स्काय वॉकचे काम २४ महिन्यांत पूर्ण करावयाचे होते. परंतु ऐनवेळी ही निविदा वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार आणि अन्य तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंढरपुरातील कार्यकारी अमित निमक यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत ही निविदा पुन्हा नव्याने काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूरच्या दर्शन मंडपासह स्काय वॉक उभारणीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाला होता. परंतु या कामाची प्रसिद्ध झालेली निविदा आता थांबविण्यात येण्यामागचे निश्चित कारण उलगडले नाही. याबाबत विविध राजकीय तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.

Story img Loader