सोलापूर :बांगलादेशात अराजकता माजल्यानंतर हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. अनेक मंदिरांची नासधूस होत आहे.या बाबीची केंद्रातील मोदी सरकारने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सोलापुरातील सर्व जात-धर्म एकता मंचने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मंचच्या शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केले आहे. १९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवून बांगलादेशाची निर्मिती करण्यात मोठा वाटा उचलला होता. परंतु याच बांगलादेशात अलीकडे राजकीय अराजकता माजल्यानंतर तेथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात लक्ष्य बनविले जात आहे. हिंदू कुटुंबीयांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असून मंदिरांचीही नासधूस केली जात आहे. ही बाब तमाम भारतीयांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारी संतापजनक ठरली आहे. केंद्रातील मोदी सरकारने या प्रश्नावर वेळीच कठोर पावले उचलून बांगला देशातील हिंदू समाजावरील वाढते अन्याय अत्याचार थांबवावेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पणाला लावावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

अखिल भारतीय मराठा महासंघाचे दास शेळके, वीरशैव लिंगायत समाजाचे विजयकुमार हत्तुरे, मुस्लीम समाजाचे रसूल पठाण, शीख समाजाचे पोपटसिंग टाक, ख्रिश्चन समाजाचे जेम्स जंगम, जैन समाजाचे पराग शहा यांच्यासह वडार समाजाचे शंकर चौगुले, जांबमुनी मोची समाजाचे देवेंद्र भंडारे, वीरशैव गवळी समाजाचे सागर कलागते, धनगर समाजाचे राज सलगर, बंजारा समाजाचे युवराज राठोड, चर्मकार समाजाचे संजय शिंदे, कोळी समाजाचे गणेश कोळी, नवबौद्ध समाजाचे प्रमोद गायकवाड, मातंग समाजाचे सुरेश पाटोळे, ब्राह्मण समाजाचे अजित कुलकर्णी, बेरड समाजाचे शाम धुरी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur sarva jat dharm ekta manch demand modi government to stop atrocities against hindus in bangladesh css