सोलापूर : मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांना अगोदर कुर्डूवाडीजवळ या आंदोलकांनी अडवले. या वेळी त्यांना मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर बार्शीत शेतकरी संवाद मेळाव्यातही पवार हे भाषण करीत असताना या प्रश्नावर आंदोलकांकडून पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. याच वेळी एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा सारा घटनाक्रम पाहता मराठा आरक्षण प्रश्नावर आता पवार यांनाही रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवार हे रविवारी बार्शी येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यासाठी जात असताना कुर्डूवाडीजवळ अंबड (ता. माढा) येथे मराठा आंदोलकांनी त्यांना अडवले. या वेळी त्यांनी पवारांकडे मराठा आरक्षणाबद्दल विचारणा केली. यावेळी पवार यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे सांगितले मात्र त्यावर आंदोलकांचे समाधान झाले नाही. तुम्ही खूप दिवसांपासून मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगता. मात्र जाहीरपणे भूमिका स्पष्ट करीत नाहीत, अशा शब्दात या कार्यकर्त्यांनी पवार यांना विचारणा केली. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाबाबत आंदोलने केली जात आहेत, त्याबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी. ते लोक आपल्या पक्षाचे आहेत की मराठा आंदोलक आहेत, हेही सांगावे, असाही आग्रह या आंदोलकांनी धरला.

हेही वाचा – उज्ज्वल निकम यांच्यावरील हरकतीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

धाराशिवमध्ये नुकताच राज ठाकरे यांना विरोध करणारे मराठा आंदोलक हे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे होते. तसेच कुर्डूवाडीत विरोध करणारे मराठा आंदोलक हे मनसेचे स्थानिक पदाधिकारी होते. दरम्यान, बार्शी येथे शेतकरी संवाद मेळाव्यात शरद पवार हे भाषण करीत असताना जमावातील काही तरुणांनी अचानकपणे त्यांना काळे झेंडे दाखवून ‘एक मराठा-लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला. दरम्यान हा प्रकार शांत होईपर्यंत याच वेळी अन्य एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे मेळाव्यात पुन्हा गोंधळ उडाला. बाबासाहेब शिवाजी बारकूल (रा. गाडेगाव रोड, बार्शी) असे या तरुणाचे नाव आहे. त्यास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

हेही वाचा – राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला, देवेंद्र फडणवीस यांचे विधान; कुणाला मिळणार उमेदवारी?

एकूणच मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur sharad pawar opposed over maratha reservation issue stopped at kurduwadi slogan raising in barshi self immolation attempt by a youth ssb