सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी मठात घुसून तेथील वयोवृद्ध धर्मोपदेशकावर सशस्त्र हल्ला करण्याचा प्रकार घडला. मठाच्या मालकीच्या वादातून घडलेल्या या घटनेप्रकरणी सहा जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्वांना अटक करण्यात आली आहे.
सिद्धनकेरी गावात वीरशैव लिंगायत समाजाचा तोफकट्टी संस्थान नावाचा जुना मठ कार्यरत आहे. या मठात राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी (वय ६४) हे गेल्या ३६ वर्षांपासून धर्मोपदेशक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या मठाच्या मालकीहक्कावरून दोन गटांत न्यायालयीन वाद सुरू आहे. यापूर्वी पंढरपूरच्या सत्र न्यायालयाने या वादावर राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या बाजूने निकाल दिला होता. दरम्यान, राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी हे रात्री तोफकट्टी संस्थान मठात आपल्या खोलीत असताना तेथे राजू लिंगप्पा कोरे (वय ३२), मंजुनाथ सकलेश कोरे (वय ४०), प्रमोद सिद्धप्पा कोरे (३६), भीमू सिद्धप्पा कोरे (वय ४२), संतोष रामचंद्र कोरे (वय ३५) आणि सिद्ध येशप्पा कोरे (वय ३०) हे सहा जण आले. त्यांनी राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संदर्भात सहाही जणांना अटक करण्यात आली असून सर्वांना पोलीस कोठडी देण्यात आले आहे.
वीरशैव जगद्गुरूंच्या बैठकीत निषेध
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील सिध्दनकेरी गावात तोफकट्टी संस्थान मठात धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजींवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा सोलापुरात काशीच्या जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निषेध नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तातडीने तपास करून हल्लेखोरांना कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचे ठरले.