सोलापूर : वन्यजीव संरक्षण कायद्याखाली सर्वोच्च संरक्षण देण्यात आलेल्या घोरपडींना मारून त्यांच्या गुप्तांगांची होणारी तस्करी सोलापुरात पकडण्यात आली. सोलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या या कारवाईत तिघाजणांकडून १५१ घोरपडींचे गुप्तांग हस्तगत करण्यात आले. या गुप्तांगांचा वापर अंधश्रद्धेपोटी काळी जादू किंवा वनौषधीसाठी केला जातो, अशी माहिती समोर आली आहे.
या कारवाईत विठ्ठल सुग्रीव पाटोळे (वय २९), त्याचे वडील सुग्रीव रंगनाथ पाटोळे (वय ६०, रा. पिंपळा वडवणी, जि. बीड) आणि बाळासाहेब लक्ष्मण डोरले (वय ३४, रा. चिखल, बीड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोरपड वन्य प्राणी वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदे अंतर्गत शेड्युल्ड एकमध्ये मोडतो. त्यास अतिउच्च दर्जाचे संरक्षण देण्यात आले आहे. त्याची शिकार करणे किंवा विक्री करण्यास गंभीर गुन्हा मानला जातो. यात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे.
घोरपडींच्या गुप्तांगांची (हात्ताजोडी) विक्री करण्यासाठी काही व्यक्ती सोलापूर रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती एका खब-यामार्फत वन विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सकाळपासून सापळा लावण्यात आला होता. दरम्यान, एका चारचाकी मोटारीतून आलेल्या तिचा संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडे १५१ घोरपडींच्या गुप्तांगांचा साठा आढळून आला. उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) रोहितकुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, इरफान काझी, शशिकांत सावंत, वनरक्षक श्रीशैल पाटील, सोनके, योगेश जगताप आदींच्या पथकाने केलेल्या या कारवाईसाठी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (सातारा) आणि हेमंत केंजळे यांचा सहयोग दिला होता.