सोलापूर : बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय १८) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.
विनायक मंद्रूप गावातील लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी वाणिज्य परीक्षा देत होता. त्याने आतापर्यंत चार विषयांचे पेपर लिहिले होते. परंतु रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला. मंद्रूप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. विनायक याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, यांचा उलगडा लगेचच झाला नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.