सोलापूर : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी क्रूरपणे हल्ला करून निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात शोक आणि संताप व्यक्त होत असताना सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारा मजकूर समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. करमाळा तालुक्यातील शेळगाव वांगी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी संबंधित तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
अझहर आसीफ शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांची वेचून क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. सर्वत्र पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध तीव्र आंदोलन होत असताना करमाळा तालुक्यात शेख याने समाजमाध्यमावर या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले. हा प्रकार हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर लक्ष्मण बबन साखरे (रा. टाकळी, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद नोंदविली. अझहर याने समाजात तेढ आणि तणाव निर्माण होईल, असा समर्थनार्थ मजकूर ठेवत दुसऱ्या समाजाविरुद्ध चिथावणी देण्याचा प्रकार घडलेला असल्याने यातून सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.