सोलापूर : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचल्यामुळे सोलापुरात वातावरण तापले असताना उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी ४४ अंश सेल्सियसपर्यंत तापमानाचा पारा वाढला होता. यंदाच्या उन्हाळ्यात हे सर्वोच्च तापमान मानले जाते.
गेल्या आठवड्यापासून सोलापुरातील तापमान पुन्हा वाढत असताना गेल्या रविवारी, २८ एप्रिल रोजी तापमान ४३.७ अंशांवर गेले होते. एकीकडे लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी वाढल्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा उत्तरोत्तर वाढले आहे. अशा तप्त वातावरणात गेल्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरदुपारी तळपत्या उन्हात होम मैदानावर जाहीर सभा झाली होती.
त्यानंतर मंगळवारी दुसर्या दिवशी तापमानाचा पारा आणखी पुढे सरकत तब्बल ४४ आंशांवर पोहोचल्यामुळे प्रचंड उष्मा अधिक त्रासदायक ठरला आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाचे असह्य चटके सहन करावे लागत असून दुपारी रस्त्यावरील वर्दळ रोडावली आहे. बाजारपेठांमध्ये उन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी रस्त्यावर ग्रीन नेटच्या पडद्यांचे मंडप उभारले जात आहेत. डोक्यावर टोपी, पांढरे गमजे घालून फिरावे लागत आहे.
तर महिलांना तोंडावर स्कार्फ लावून उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करावा लागत आहे. घरात, कार्यालयात २४ तास विद्युत पंख्यापेक्षा कुलर, वातानुलित यंत्रांचा वापर करावा लागत आहे. रात्री घराच्या गच्चीवर झोपतानाही वारा खेळत नसल्यामुळे उष्णतेची धग बेचैन करीत आहे. लहान मुले झोपेतून दचकून जागे होत आहेत.