सोलापूर : लोकसभा निवडणुकीत रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांनी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत ताकद पणाला लावल्यामुळे राजकीय वातावरण जास्त तापले असताना दुसरीकडे सूर्यनारायण अक्षरशः कोपल्यामुळे सोलापूरकर हैराण झाले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात रविवारी तापमानाचा पारा सर्वाधिक ४४. ४ अंशांवर पोहोचला.
गेल्या दहा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंशांपेक्षा जास्त असून गेल्या २८ एप्रिल रोजी ४३.७ तर ३० एप्रिल रोजी ४४ अंशांवर पारा चढला होता. अंगाची लाही लाही करणारा यंदाचा उन्हाळा त्रासदायक ठरला आहे. यातच तापमान पुन्हा वाढून ४४.४ अंशांवर गेल्यामुळे सोलापूरकरांची जीवाची तगमग वाढली आहे.
हेही वाचा- सांगली : फेक न्यूज समाजमाध्यमात प्रसारित केल्याबद्दल अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू
सोलापुरात यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरत असून तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे जात आहे. अशा असह्य तापमानामुळे एका शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील केगाव बुद्रूक येथे ही घटना घटली. सुरेश सिद्रय्या परशेट्टी (वय ५६) असे उष्माघाताचा बळी ठरलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील शंकरलिंग प्रशालेत कार्यरत होते. तळपत्या उन्हात दुचाकीने घरी परत आल्यानतर परशेट्टी यांनी पाणी प्राशन केले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाची न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नीसह एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.