सोलापूर : उजनीतील जीवघेण्या जलवाहतुकीपासून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीने कुगाव (ता. करमाळा) ते शिरसोडी (ता. इंदापूर) या अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर उड्डाणपुलाची उभारणी होणार आहे. त्यासाठी शासनाने यापूर्वी ३९५ कोटी ९७ लाख ३२ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आता पुलाच्या कामाची २८४ कोटी ५३ लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. नुकतीच २१ मे रोजी कुगाव येथून शिरसोडीकडे जाणारी प्रवासी बोट उलटून त्यात सहा जणांनी जीव गमावला होता.
सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याने वेढलेल्या उजनी जलाशयात जलवाहतूक हेच दळणवळणाचे प्रमुख साधन असून, भूमार्गाने प्रवास केल्यास १०० ते १२५ किलोमीटर अंतर दूर नाहक वळसा घालावा लागतो. उजनी जलाशयातील प्रवास केवळ पाच किलोमीटर अंतराचा आहे. या भागात तिन्ही बाजूंनी जलाशयाने वेढलेले असून, त्यात कुगाव व शिरसोडीसह वाशिंबे, कळाशी, सोगाव, गंगावळण, कलठण, चिखलठाण, गोयेगाव, आगोती, पडथाळ, ढोकरी, शहा, केत्तूर, चाआडगावा आदी १४ गावे एकमेकांशी जोडली आहेत. परंतु या जलाशयात बोट प्रवासी वाहतूक तेवढीच जीवघेणी समजली जाते. अधूनमधून घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना जोडल्या गावांच्या दरम्यान, उजनी जलाशयावर कुगाव ते शिरसोडीसह गोयेगाव (ता. करमाळा) ते आगोती (ता. इंदापूर) आदी जलमार्गावर पुलाची उभारणी करण्याची मागणी सातत्याने होते.
दरम्यान, कुगाव ते शिरसोडी या पाच किलोमीटर अंतराच्या जलमार्गावर नवीन पूल बांधण्यासाठी शासनाने ३९७ कोटी ९७ लाख ३२ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता यापूर्वीच दिली आहे. तर अलीकडे पुलाच्या कामासाठी २८४ कोटी ५३ लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध झाली आहे. दुसरीकडे गोयेगाव ते आगोती दरम्यानच्या जलमार्गावर पूल बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यावर कार्यवाही प्रलंबित आहे.
हेही वाचा…सोलापूरच्या विद्यापीठात तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात ५० जागा राखीव
उजनी जलाशयावर कुगाव-शिरसोडी व अन्य गावांसाठी चार जलमार्ग आणि एकच भूमार्ग उपलब्ध आहे. जलमार्ग नजीकच्या अंतरावर असले, तरी ते तेवढेच जोखमीचे आणि जीवघेणे समजले जातात. दुसरीकडे भूमार्गाने जायचे तर सुमारे १२५ किलोमीटर अंतर नाहक वळसा घालावा लागतो. जलवाहतुकीने जवळच्या गावाला जायचे तर अवघी १५ ते २० मिनिटे लागतात. भूमार्गाने तीन तास लागतात. शिवाय जलवाहतुकीच्या तुलनेत जादा पैसे आणि वेळ खर्च करावा लागतो. मात्र कुगाव ते शिरसोडी दरम्यान जलाशयावर पुलाची उभारणी होणार असल्यामुळे करमाळा व इंदापूर भागातील गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. विशेषतः उजनी जलाशय परिसरात विशेषतः वाशिंबे व अन्य भागात निर्यातक्षम केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथील केळी प्रामुख्याने आखाती देशांमध्ये निर्यात होतात. त्या दृष्टीने मुंबईच्या बंदरापर्यंत ही केळी पाठविण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
© The Indian Express (P) Ltd