सोलापूर : उभारणी होऊनही उर्दू घराच्या लोकार्पणाचा रखडलेला मुहूर्त अखेर ठरला. अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांच्या उपस्थितीत या उर्दू घराचा लोकार्पण सोहळा ठरला होता. प्रत्यक्षात दोन्ही जबाबदार मंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्यामुळे अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्या हस्ते या उर्दू घराचे लोकार्पण उरकण्यात आले. यातून उर्दू भाषा, साहित्य व संस्कृतीविषयी मंत्री व लोकप्रतिनिधींनी अनास्था दिसून आली.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयासमोर सुमारे पाच कोटी रुपये करून उभारण्यात आलेल्या देखण्या उर्दू घराचे लोकार्पण अनेक दिवसांपासून लटकले होते. २०१३ साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या उर्दू घराचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर देशात व राज्यात सत्तांतर झाले आणि या उर्दू घराची उभारणी कागदावरच राहिली. त्यावेळी उर्दूप्रेमींनी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र अखेर उशिरा का होईना, उर्दू घराची वीट चढली आणि कशीबशी उभारणी झाली. परंतु त्यानंतर अनेक दिवस लोकार्पण लटकले होते. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या उर्दू घराच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला. राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शेजारच्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे उर्दू घर सजवून लोकार्पण सोहळ्याची जयत तयारी करण्यात आली होती. प्रत्यक्षात दोन्ही मंत्र्यांसह एकही लोकप्रतिनिधी फिरकला नाही. प्रमुख यजमान असलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हेसुद्धा आले नव्हते. शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्या हस्ते या उर्दू घराचे लोकार्पण उरकण्यात आले. यातून उर्दू भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल शासनाची आणि लोकप्रतिनिधींची असलेली अनास्था समोर आली. त्याबद्दल उर्दू भाषा, साहित्य व कलाक्षेत्रात तीव्र नाराजीचे पडसाद उमटले आहेत.
हेही वाचा – रायगड : रोह्यात तीन एकरवर साकारली शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य रांगोळी
अखेरपर्यंत उपेक्षाच
सोलापुरात उर्दू साहित्य व कला क्षेत्र मोठे आहे. यापूर्वी येथे अखिल भारतीय उर्दू नाट्य संमेलन झाले होते. उर्दू घर उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून होती. अकरा वर्षांपूर्वी उर्दू घराचे भूमिपूजन झाल्यानंतर पुढे तीन-चार वर्षे साधी वीटसुद्धा चढली नव्हती. त्यासाठी तीन वेळा आंदोलन करावे लागले होते. शेवटी उशिरा का होईना, उर्दू घर साकार झाले असताना लोकार्पणासाठी संबंधित मंत्रीच काय, एकही जबाबदार लोकप्रतिनिधी फिरकू नये, ही उर्दुविषयीची अनास्था नाही तर दुसरे काय ? – ॲड. यू. एन. बेरिया, माजी महापौर, अध्यक्ष, अ. भा. उर्दू नाट्य परिषद, सोलापूर