सोलापूर : जूनमध्ये मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे उजनी धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली खरी; परंतु गेल्या दीड महिन्यात पावसाळा सुरू होऊनसुद्धा धरण अद्याप वजा पातळीतच राहिले आहे. वजा पातळीतून बाहेर येण्यासाठी आणखी १२ टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. तर धरण शंभर टक्के भारण्यासाठी तब्बल ७० टीएमसी पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठावी लागणार आहे. उजनीच्या वरच्या भागात, पुणे जिल्ह्यातील लहानमोठी १९ धरणे भरल्यानंतर उजनी धरणात पाणीसाठा वाढणार आहे. त्यादृष्टीने पुढील महिनाभरात पुणे जिल्ह्यातील मोठ्या पावसावर उजनीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सध्या उजनीच्या वरच्या भागातील मुक्त लाभक्षेत्रातूनच उजनी धरणाची संथगतीने उपयुक्त पातळीकडे वाटचाल दिसून येते. सध्या उजनी धरणात एकूण ५१.७१ टीएमसी पाणीसाठा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा वजा ११.९५ टीएमसी आहे. पाणीसाठ्याची टक्केवारी २२.३१ एवढी आहे. दौंड येथून धरणात ८६३१ क्युसेक विसर्गाने पाणी मिसळत आहे. एकूण १२३ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा वजा पातळीत धरला जातो. म्हणजेच यातून काटकसरीने पाणी वापराबद्दल धोक्याचा इशारा मानला जातो.
गतवर्षी अपुऱ्या पाऊसमानामुळे उजनी धरण ६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. परंतु त्याबाबतचे भान न ठेवता राजकीय दांडगाईमुळे धरणाच्या पाणी वाटपात नियोजनाचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे धरण वजा ६० टक्क्यांपर्यंत पार रसातळाला गेले होते. सुदैवाने यंदाच्या वर्षी समाधानकारक म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे उजनी धरण झपाट्याने भरण्याच्या अनुषंगाने सोलापूरकरांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यानुसार सुरुवातीला जूनमध्ये मृग नक्षत्रातच पावसामुळे धरणात पाणीसाठा वधारू लागला. नंतर पाऊस थंडावला. एकीकडे पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाले दुथडी भरून वाहात असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु दुसरीकडे उजनी धरणाच्या वरच्या भागात भीमा खोऱ्यात तुलनेने पावसाचे प्रमाण कमीच आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यातील धरणांची स्थितीही तेवढी समाधानकारक नाही.
कळमोडी, वडीवळे, कासरसाई, पानशेत, खडकवासला आदी मोजक्या धरणांचा अपवाद वगळता अन्य धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खालीच आहे. भीमा खोऱ्यात दमदार पाऊस झाला तरच त्याचा फायदा उजनी धरणाला होऊ शकेल. पुणे जिल्ह्यात राखी पौर्णिमेनंतर पावसाचे प्रमाण घटते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात पुणे जिल्ह्यात मोठा पाऊस झाला तरच त्यातून उजनी धरणात पाणीसाठा वाढणार आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी ७० टीएमसी पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठायची आहे. त्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील मोठ्या पावसावरच उजनीचे भवितव्य अवलंबून आहे. सुदैवाने सध्या संथगतीने का होईना, दौंड येथून उजनी धरणात पाणी मिसळत आहे. मागील आठवडाभरात धरणात ११.२१ टक्के म्हणजे सहा टीएमसी पाणीसाठा वधारला आहे. ही गती वाढण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.