सोलापूर : गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात मोहोळजवळ उजेडात आलेल्या मेफेड्रोन (एमडी) अंमलपदार्थ उत्पादन व तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या अकरापैकी आरोपींवर मोक्का अंतर्गत वाढीव कारवाई करण्यात आली आहे. यापैकी फेरअटक केलेल्या तीन आरोपींना मोक्का न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
दत्तात्रेय लक्ष्मण घोडके (वय ४०) व गणेश उत्तम घोडके (वय ३२, दोघे रा. औंढी, ता. मोहोळ) आणि किरणकुमार सूर्यकांत पाटील-बिराजदार (वय ३७, रा. बीदर, कर्नाटक) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा…“मंत्री मला म्हणतात, काहीही बोला पण…”, मनोज जरांगेंनी सांगितली राज्य सरकारची भिती
सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यात देवडी फाट्याजवळ २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मोहोळ पोलिसांनी दत्तात्रेय घोडके व गणेश घोडके यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा कोटी २ लाख रूपये किंमतीच्या मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थाचा तीन किलो दहा ग्रॅम एवढा साठा हस्तगत केला होता. यातून मेफेड्रोन तस्करांची टोळीचा पर्दाफाश होऊन अकराजणांना अटक झाली होती. तर अद्यापि सहा आरोपी फरारी आहेत.
हेही वाचा…“मराठा समाजाला हात जोडून विनंती, मला…”, मनोज जरांगेंना अश्रू अनावर
अटकेतील आरोपींविरूध्द अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली (एनडीपीएस ॲक्ट) न्यायालयात दोषारोप पत्र सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून या टोळीतील सहा आरोपींविरूध्द वाढीव मोक्का अंतर्गत कारवाईचे कलम वाढविण्यास मंजुरी देत तसे आदेश जारी करण्यात आले. त्यापैकी तीन आरोपींना फेरअटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सोलापूरच्या मोक्का न्यायालयात हजर केले.या आरोपींना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठाडी मिळाली आहे. यावेळी सरकारतर्फे ॲड. आर. जे. बुजरे तर आरोपींतर्फे ॲड. सचिन इंगळगी यांनी काम पाहिले.