सोलापूर : चार वर्षांपूर्वी करमाळ्यात नरभक्षक बिबट्याची दहशत अनुभवल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अधूनमधून विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर सुरूच असताना बार्शी तालुक्यासारख्या भागात आता बिबट्याबरोबरच प्रथमच वाघाचीही दहशत पाहावयास मिळत आहे. शेतात पाण्याचे आवर्तन सोडण्यासह इतर शेती कामे करण्यासाठी जाणारे शेतकरी दहशतीखाली दिसत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने तब्बल ५०० किलोमीटर दूर स्थलांतर करीत सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात प्रवेश केला आहे. जिल्ह्यात गेल्या सुमारे ५० वर्षांत प्रथमच वाघाचा वावर दिसून आला आहे. बार्शी तालुक्यात ठिकठिकाणी वाघावर नजर ठेवण्यासाठी सापळा कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सापळा कॅमेऱ्यातून ढेंबरेवाडीत तलावाजवळ सायंकाळी पाण्याच्या शोधात आलेल्या वाघाची छबी कैद झाली आहे.

हेही वाचा : सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा

गेल्या शनिवारी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर येडशी- पांगरी परिसरातील रामलिंग अभयारण्याच्या परिसरात सर्वप्रथम वाघोबाचे दर्शन झाले. त्यानंतर ढेंबरेवाडीसह घोळवेवाडी, चिंचोळी, पांढरी आदी १४ गावांच्या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने परिसरातील गावकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सुरुवातीला वाघाचे दर्शन झाले तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. कारण या भागात बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. त्यामुळे वाघ नसून, तर बिबट्या असल्याची समजूत होती. परंतु, नंतर सापळा कॅमेऱ्यात वाघ दिसून आल्यानंतर त्याची खात्री पटली. गेल्या तीन दिवसांत वाघाने रानडुकराची शिकार केल्याचे वन विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या वन विभाग वाघावर केवळ लक्ष ठेवून आहे. त्यास पकडण्याची कारवाई वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यानंतरच होऊ शकते.

हेही वाचा : महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्यापाठी वाघाची दहशत

करोना महामारीच्या काळात टाळेबंदी असताना मराठवाड्यातून करमाळा तालुक्यात उजनी जलाशयाच्या परिसरात आलेल्या बिबट्याने दहशत निर्माण केली होती. अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकारीपाठोपाठ बिबट्याने तिघाजणांचे बळी घेतले होते. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला शेवटी गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या पश्चातही माढा, मोहोळ, बार्शीसह उत्तर सोलापूर तालुक्यातही बिबट्याचा वावर अधून मधून पाहावयास मिळतो. बिबट्यांची संख्या तीनपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविली जात असताना सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ एका अज्ञात वाहनाखाली चेंगरून एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही बिबट्याचे दर्शन घडत असून अलीकडे सोलापूर शहरापासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावरील मार्डी (उत्तर सोलापूर) परिसरातही बिबट्याचा वावर दिसून आल्याची नोंद आहे.