सोलापूर : समाजात आजसुद्धा हेटाळणीचा विषय ठरणाऱ्या तृतीयपंथीय घटकातील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शिक्षणाची दारे सन्मानाने खुली केली आहेत. विद्यापीठाने उच्च शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम घेणाऱ्या बारावी उत्तीर्ण तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात ५० जागा राखीव ठेवल्या आहेत.
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी प्रक्रिया हाती घेतली आहे. समाजात एकीकडे तृतीयपंथीय स्थानिक स्वराज्य संस्थांसह काही राज्यांमध्ये विधानसभांमध्ये प्रतिनिधित्व करीत, सरकारी-निमसरकारी नोकऱ्याही पटकावित असताना दुसरीकडे समाजात या दुर्लक्षित घटकाची हेटाळणी थांबायला तयार नाही.
शिक्षणाच्या प्रवाहात तृतीयपंथीय वर्ग अद्यापि सामावलेला नाही. त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. कुलगुरू डॉ. महानवर यांनी किमान ५० तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विद्यापीठात राहून उच्च शिक्षण वा व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शिकण्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी वसतिगृह उभारणीसाठी विशेष प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार असून, शक्यतो चालू शैक्षणिक वर्षापासून तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आवश्यक सुविधांनी युक्त वसतिगृहामध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.