सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या जोमदार पावसानंतर खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून विशेषतः मृगाच्या शेवटी आणि आर्द्रा नक्षत्रात पावसाने ओढ दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाफसा तयार झाला. परिणामी, आजमितीला जिल्ह्यात खरिपाचा २७० टक्के पेरा झाला आहे. यात सोयाबीनचा पेरा एक लाख ३२ हजार ४४० हेक्टर तर उडिदाचा पेरा एक लाख ३४ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रात गेला आहे. सोयाबीन आणि उडीद या दोन्ही पिकांची मिळून दोन लाख ६६ हजार ९०३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
साखरेचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात आता उसापाठोपाठ उडीद आणि सोयाबीनचे उत्पादन होत आहे. रब्बी हंगामाचा म्हणून परिचित असलेल्या सोलापूर जिल्ह्यात खरीप पेरण्यांचे एकूण सरासरी क्षेत्र दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर असताना प्रत्यक्षात पावसामुळे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणात चार लाख ९२ हजार ८४५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. यात उडीद व सोयाबीनसह मका, बाजरी, तूर, मूग, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेषतः अलिकडे जिल्ह्यात बार्शीसह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ व अक्कलकोट भागात सोयाबीन पेरा वाढत आहे. सोयाबीन पेरणीचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ०६७ हेक्टर असताना प्रत्यक्षात एक लाख ३२ हजार ४४० हेक्टर (२८१.३९ टक्के) एवढ्या पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक बार्शीत ८५ हजार ३४ हेक्टर क्षेत्रात (२१९.९९ टक्के) सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर उत्तर सोलापुरात केवळ १३१६ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना त्याच्या तेरा पटींनी जास्त म्हणजे १६ हजार ७५९ हेक्टर क्षेत्रात (१२७३ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. मोहोळ-९३७३ हेक्टर (८४०.६३ टक्के), दक्षिण सोलापूर-६९९९.४ हेक्टर (४१९.०८ टक्के) आणि अक्कलकोट-१३ हजार ६१७ हेक्टर (३८० टक्के) याप्रमाणे सोयाबीनचा पेरा वाढला आहे. सुदैवाने या पिकांची उगवण होत असताना अजून तरी गोगलगाईंचा प्रादुर्भाव झाला नाही, असा दावा केला जात आहे.
हेही वाचा – सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पावसाचा जोर; उजनीत वाढतोय पाणीसाठा
सोयाबीनपेक्षा जास्त म्हणजे उडीद डाळीची लागवड झाली असून ती एक लाख ३४ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रात (२८९.३१ टक्के) आहे. करमाळ्यात सर्वाधिक ५५ हजार ८३७ हेक्टर (१०७१ टक्के) उडीद पेरणी झाली आहे. त्याखालोखाल अक्कलकोट (२७ हजार ६४२ हेक्टर, १४१ टक्के), माढा (२० हजार ५२१ हेक्टर, ४६५.५२ टक्के), दक्षिण सोलापूर (१४ हजार ३२२ हेक्टर, २६९ टक्के) आदी भागात लागवड केलेली उडीद बहरत आहे.
एरव्ही, भुईमूग पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याची परंपरा अलिकडे खंडित होत आहे. लागवड खर्चाच्या प्रमाणात हाती येणारे उत्पन्न कमी असल्यामुळे यंदा ४८५९ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ २७५७ हेक्टर क्षेत्रात ( ५६.७५ टक्के) भुईमुगाची लागवड झाली आहे. सूर्यफुलाचीही जवळपास हीच तऱ्हा असून सध्या ६६३४ हेक्टर क्षेत्रापर्यंतच्या (७४ टक्के) मर्यादेत सूर्यफुलाचा पेरा झाला आहे. गळीतधान्यांची पेरणी एक लाख ४१ हजार ८५४ हेक्टर (२२८.३६ टक्के) क्षेत्रात झाली आहे.
हेही वाचा – सांगली : पूरबाधित भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू; कृष्णा, वारणा पात्राबाहेर
तृणधान्यांमध्ये मक्याची लागवड ८३ हजार १२९ हेक्टर क्षेत्रात (२३५.१४ टक्के) झाली आहे. तर बाजरी (२४ हजार २०५ हेक्टर, ६१ टक्के), तूर (९५ हजार ७५३ हेक्टर, ११०.८६ टक्के), मूग (१२ हजार ८५४ हेक्टर, ७४.४५ टक्के) याप्रमाणे पेरण्या झाल्या आहेत. या पिकांच्या वाढीसाठी बेताने पडणारा पाऊस पोषक मानला जातो.