सोलापूर : मोहोळ तालुक्यातील नरखेडजवळ भोगावती नदीच्या पात्रात पडलेल्या शेळीला वाचविण्याच्या प्रयत्नात एक तरुण वाहून गेला. त्याचा शोध शुक्रवारी दुपारपर्यंत लागला नव्हता. सूरज मसा कसबे (वय २४, रा. नरखेड) असे नदीच्या पात्रात वाहून गेलेल्याचे नाव आहे.
मोहोळ व बार्शी तालुक्यातून वाहणाऱ्या भोगावती नदीला पाणी वाढले असून पाण्याचा प्रवाह वाढत आहे. नदीपासून काही अंतरावर सूरज कसबे हा शेळ्या राखत होता. शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी नदीवरील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ गेला असता शेळ्यांच्या कळपातील एक शेळी चुकून नदीच्या पात्रात उतरली. ती शेळी नदीत वाहून जाण्याच्या भीतीमुळे सूरज शेळीला बाहेर काढण्यासाठी नदीच्या पात्रात तत्काळ धावून गेला. परंतु पाय घसरल्याने तो नदीच्या पात्रात कोसळला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे आणि पोहताही येत नसल्यामुळे सूरज वाहून गेला. ही घटना कानावर येताच घटनास्थळी गावकरी धावून गेले.
हेही वाचा – Ajit Pawar : “बाईकवरून खूप जणींना घेऊन फिरलोय”, बुलेट स्वारी करताना अजित पवारांचं विधान!
दरम्यान, नरखेडचे सरपंच बाळासाहेब मोटे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यास माहिती कळविली. त्याचवेळी नदीच्या पात्रात पट्टीचे पोहणाऱ्यांनी धाव घेऊन नदीच्या पात्रात उतरून बेपत्ता सूरज कसबे याचा शोध घेण्याचे काम हाती घेतले. परंतु ३६ तास उलटूनही सूरज याचा शोध लागला नव्हता.