सोलापूर : पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यानंतर तिसऱ्याच दिवशी पत्नीने आपल्या चिमुकल्या मुलीसह गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. माढा तालुक्यातील घाटणे येथे हा धक्कादायक प्रकार घडला.

जनाबाई हरिदास लोंढे (वय ३४) आणि तिची मुलगी सातेरी (वय ४) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत. घाटणे गावात राहणारे हरिदास जानू लोंढे (वय ४०) यांनी पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेमुळे लोंढे कुटुंबीय शोकाकूल असताना पत्नी जनाबाई हिला पतीविरहाचा धक्का सहन झाला नाही. पतीचा अंत्यविधी झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी, माती सावडण्याचा विधी उरकल्यानंतर जनाबाई आपल्या मुलीसह बेपत्ता झाली. दोघी मायलेकी कुठेही न सापडल्यामुळे दोघी हरवण्याची फिर्याद कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.

दरम्यान, गावातील विहिरीमध्ये मायलेकींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. मृत हरिदास आणि जनाबाई यांचा १५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्यास सहा मुली होत्या. हरिदास याने जीवनयात्रा संपविली आणि त्यानंतर तिसऱ्याच दिवशी पत्नी जनाबाई हिने मुलगी साजेरी हिच्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याने संपूर्ण घाटणे परिसर हादरला आहे. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader