सामान्य खेडूत महिलांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘उमेद’ अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. या माध्यमातून स्वयं सहायता महिला बचत गटांना १८६ कोटींचे अर्थसाह्य मिळवून देण्यात आले आहे.
केंद्र सरकाराने ग्रामीण महिलांच्या विकासासाठी सुरू केलेल्या ‘उमेद’ अभियानाची वचनबध्दता टिकविण्याकामी सोलापूर जिल्ह्याने मागील सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करीत ९८.३३ टक्के उद्दिष्ट साध्य केले होते. यात संपूर्ण राज्यात सोलापूर सर्वप्रथम आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून त्याकरिता महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी उमेद अभियान राबविले जाते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा स्वयंसहायता बचत गटांतील सहभाग वाढविला आहे. त्यासाठी हे अभियान गतिमान करीत स्वयंसहायता बचत गटांना १८६ कोटींचे अर्थसाह्य उपलब्ध करून देत ११४ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. या माध्यमातून स्वयंसहायता महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून महिलांना आर्थिक आधार देण्यासही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राधान्य दिले.
जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक संतोष धोत्रे यांनीही जिल्हा व तालुकास्तरावर बँकांसोबत बैठका घेणे, कार्यशाळा आयोजित करणे आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत समूह गूरामसंघ आणि प्रभागसंघांची नोंदणी करण्यातसुध्दा महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. तसेच रूक्मिणी सप्ताह राबवून महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यातही वाटा उचलला. उत्पादित मालाला नाममुद्रा मिळवून देण्याबरोबरच उत्पादित मालाचे पॕकेजिंग आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी व्यवहार करण्याचे प्रशिक्षण तथा मार्गदर्शन मिळवून दिले. ज्या गावात १५ पेक्षा जास्त स्वयंसहायता महिला बचत गट कार्यरत आहेत, अशा गावांमध्ये रूक्मिणी सप्ताह भरविण्यात आले.
मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीनंतर चालू २०२२-२३ आर्थिक वर्षात महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत नेण्याचा निर्धार दिलीप स्वामी यांनी बोलून दाखविला आहे.