सोलापूर : राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न उपेक्षित ठेवण्यात आले आहेत. विशेषतः येथील यंत्रमाग उद्योगासाठी कोणताही दिलासा मिळाला नाही. मात्र महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाइल मिशन स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाल्यामुळे सोलापुरात त्याचा लाभ मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

याशिवाय लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे धोरण जाहीर झाले असता त्याचाही लाभ सोलापूरला मिळू शकतो. त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज व्यक्त होत आहे. उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय होऊन दोन वर्षे झाली तरीही त्यादृष्टीने हालचाली ठप्प आहेत. केळी संशोधन आणि क्लस्टर केंद्र उभारण्याची मागणीही दुर्लक्षित राहिली आहे.

आगामी २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून सोलापूरकरांसाठी काही तरी पदरात पडण्याची अपेक्षा होती. परंतु त्यात निराशा झाल्याचे दिसून येते. सोलापुरी चादर, टेरी टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला सावरण्यासाठी शासनाकडून किमान हातभार लागण्याची अपेक्षा होती. यंत्रमाग उद्योगाला चालना मिळण्याच्या दृष्टीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी परिसरात यंत्रमाग वसाहत उभारण्याची मागणी सोलापूर जिल्हा यंत्रणाधारक संघाने लावून धरली होती. परंतु यात निराशा पदरी पडल्याचे संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सांगितले.

राज्यात शिर्डीबरोबर सोलापूरच्या विमानतळ विकासाची घोषणा झाली होती. परंतु शिर्डी विमानतळाचा जलदगतीने विकास झाला. आजच्या अर्थसंकल्पातही शिर्डी विमानतळ विकासासाठी १३६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु सोलापूरच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाचा विकास दुर्लक्षितच राहिला आहे.

Story img Loader