वेतनवाढीसाठी ऊस तोडणी मजुरांनी सुरू केलल्या संपाला पाठिंबा देतानाच या मागणीसाठी वेळ आल्यास आपण सत्तेचा त्याग करू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगडावर दिली.
विजयादशमीनिमित्त भगवानगडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात श्रीमती मुंडे बोलत होत्या. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, नगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गडाचे महंत नामदेवशास्त्री, खासदार राजू शेट्टी, खासदार प्रीतम मुंडे, महादेव जानकर, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे आदी या वेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, मी आता तिहेरी भूमिकेत आहे. साखर कारखानदार, शासनकर्ती आणि ऊस तोडणी मजुरांचा नेता अशा तीन भूमिका पार पाडत असले तरी, ‘ऊस तोडणी मजुरांचा नेता’ हे पद आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी या मजुरांचा स्वाभिमान जागृत केला. त्याला मी धक्का लागू देणार नाही. ऊस तोडणी मजुरांना कोणासमोर झुकू देणार नाही. या मजुरांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावर शुक्रवारीच जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असून त्यातून मार्ग निघेल, अशी आशा आहे. मात्र तसे झाले नाही तर, वेळप्रसंगी सत्तेचा त्याग करू व रस्त्यावर उतरू, असा इशारा मुंडे यांनी दिला.
परळी येथील गोपीनाथगड हा मला राजकीय प्रेरणा देणारा आहे, तर भगवानगड हा श्रध्देचा विषय आहे. या दोन्हींची एकमेकांशी तुलना करू नये, असे आवाहन मुंडे यांनी केले. त्या म्हणाल्या, ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ऊस तोड मजूर महामंडळामार्फत ती सुरू करू, असे त्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात महादेव जानकर यांना मंत्री झालेले पाहायचे आहे, असेही मुंडे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा