नाटय़दर्शन सावंतवाडीने रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकपात्री अभिनयात कलाकार सुरेश पुराणिक यांच्या अवसार (देव) संचारण्याच्या कलेस तसेच महागाईत होरपळलेल्या कुटुंबाचे मालवणीत सादरीकरण करणाऱ्या अथर्व विराज पित्रे या आठवर्षीय कलाकाराच्या कलाकृतीस उपस्थितांनी दाद दिली. नाटय़दर्शन सावंतवाडी या संस्थेने रंगभूमी दिनानिमित्त नगरपालिकेच्या जिमखाना मैदानावरील कक्षात गणेशाचे पूजन करून कलाकृती सादर केली. या वेळी गाऱ्हाणे व गणेशाचे पूजन सुरेश पुराणिक यांनी केले, पण अचानक अंगात अवसारी देवाचा संचार सादर करून त्यांनी उत्स्फूर्त कला सादर केली. कोकणात अंगात संचार आल्यावर देवाची ही कुड भक्तांना विशेष मार्गदर्शन करते. त्या पाश्र्वभूमीवर सुरेश पुराणिक यांच्या सादरीकरणास उपस्थितांनी दाद दिली. त्यांच्या अंगात कार्यक्रमात अचानक संचार आल्याने काही उपस्थित अवाक्  होऊन पाहू लागले, पण नंतर उशिराने त्या कलेची महती समजली. या वेळी अथर्व पित्रे या आठ वर्षांच्या मुलाने महागाईत कुटुंबांची होरपळ उडाल्याचे चित्र मालवणीत सादर करून दाद मिळविली. यानंतर आशीष पित्रे, तर श्रुती बोरवणकर या चारवर्षीय मुलीने कला सादर करून दाद मिळविली. डॉ. मधुकर घारपुरे यांनी पु. ल. देशपांडे यांचा अंतु बर्वा सुंदरवाडीत अवतरल्याचे सादरीकरण करून कलेचे वैशिष्टय़ मांडले.
 शिवाय दिनकर धारणकर, कल्पना बांदेकर व इतरांनी कला सादर केली. या वेळी प्रा. विजय फातर्पेकर, दिनकर धारणकर, पद्मा फातर्पेकर, सचिन धोपेश्वरकर, रमेश कासरकर, भरत गावडे, वंदना रांगणेकर, अ‍ॅड. विलास रांगणेकर, गजानन तेंडोलकर, प्रसन्न कोदे, सत्यजित धारणकर, शामसुंदर पित्रे व अन्य कलाकार उपस्थित होते. यक्षगान नृत्य नाटय़ प्रशिक्षण शिबिरास राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे, असे दिनकर धारणकर यांनी सांगितले.

Story img Loader