विविध आमीषे दाखवून दुप्पट पैसे योजनांचा सुकाळ सुरूच असून अशा अनेक योजना देशभरात सुरू आहेत. त्यापैकी राज्यातील १६२ योजनांची माहिती खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केल्या आहेत. यापैकी अनेक योजनांविरुद्ध मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग, सेबी, रिझव्र्ह बँकेमार्फत चौकशी सुरू असली तरी त्या बंद झालेल्या नाहीत आणि त्यामुळे अनेकांची फसगत होत आहे, असे सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ॉ
याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांना दिले आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकदारांचे सुमारे एक लाख कोटी अडकले आहेत. राज्यातील गुंतवणूकदारांचे सुमारे ४० हजार कोटी अशा योजनांमध्ये अडकल्याची माहितीही सोमय्या यांनी दिली.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अशा योजनांमध्ये नागरिकांनी पैसे गुंतवू नये यासाठी जागरुकता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. अशा कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यासही सुरुवात करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे विभागाचे नवे सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी स्पष्ट केले.