Bachchu Kadu on Eknath Shinde शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदेनी शिवसेनेच्या जवळपास दोन तृतियांश आमदारांना फोडल्यामुळे पक्षात मोठी फळी निर्माण झाली आहे. शिवसेनेसोबत बच्चू कडूंसारख्या काही अपक्ष आमदारांचीही साथ एकनाथ शिंदेंना आहे. शिवसेना आणि अपक्षांसोबत काही काँग्रेस आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली आहे.
अपक्षांना मिळून हा आकडा ५० पर्यंत जाण्याची शक्यता
सध्या मी गुवाहाटीत आहे. आज सर्व बंड केलेल्या आमदरांची बैठक होणार आहे. रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढची योजना आखली जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. सध्या गुवाहाटीत शिवसेना आणि अपक्षांचे मिळून ३६ आमदार एकत्र आहेत. आणखी ३ ते ४ आमदार येणार असून केवळ शिवसेनेच्या आमदारांचा आकडा ३९ पर्यंत जाईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तर अपक्षांना मिळून हा आकडा ५० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शिवसेनेकडून आमदांकडे दुर्लक्ष
एवढंच नाही तर स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या हालचालीही सुरु असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. महाराष्ट्रातील भाजपा नेते संजय कुटे आमच्यासोबत गुवाहाटीमध्ये असून सूरत आणि गुवाहाटीमधील भाजपा नेते आमच्या संपर्कात असल्याचे बच्चू कडू म्हणाले. प्रहार संघटनेच्या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. निधी वाटपाबद्दल पक्षात काहीशी नाराजी होती. मात्र, ती चर्चा करुन सोडवण्यात आली असती. पक्षश्रेष्ठींकडून शिवसेनेच्या आमदरांकडे लक्ष देण्याची गरज होती. परंतु पक्षाकडून आमदारांकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे प्रचंड नाराजी असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
भाजपा नेते आमच्या संपर्कात
शिवसेनेच्या आमदारांना उचलून गुजरातला नेण्यात आलं आणि तिथं त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, इथे कोणावरही अत्याचार किंवा अन्याय होत नसून सगळे स्वत:च्या मर्जीने इथे आल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. तसेच अनेक आमदार आम्ही येतोय असं स्वत:हून सांगत असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे.