उपमु्ख्यमंत्री अजित पवार हे येत्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांच्या वाढदिवशी अनेक ठिकाणी बॅनर्सवर त्यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला होता. यानंतर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी राजकीय चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार हे उपमुख्यमंत्री व्हायला तिकडे गेले नाहीत. ते यापूर्वी अनेकदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हायलाच तिकडे गेले असतील, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. तसेच त्यांनी अजित पवार गटाच्या बंडखोरीवरही मोठं भाष्य केलं आहे. अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आता तुरुंगात असते, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं.
हेही वाचा- “…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान
मुंबई येथे पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले, “अजित पवार हे मुख्यमंत्री होणार आहेत. ते उपमुख्यमंत्री व्हायला थोडीच तिकडे गेले आहेत. याआधी ते खूपवेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते आता मुख्यमंत्री व्हायलाच तिकडे गेले असतील, अशी चर्चा सुरू आहे. ही सत्यता आपण स्वीकारली पाहिजे.”
हेही वाचा- “भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान…
अंबादास दानवे पुढे म्हणाले, “अजित पवारांची चौकशी सुरू आहे. कारखान्याची चौकशी सुरू असून सगळं बाहेर आलं आहे. प्रफुल्ल पटेलांचीही चौकशी सुरू आहे, ते कुठे राहतात? हे सगळ्यांना माहीत आहे. ते हवाईउड्डाण मंत्री होते, तेव्हा त्यांनी काय केलं? हे सर्व जगाला माहीत आहे. हसन मुश्रीफ यांना अटक केली जाणार होती, हेही सगळ्यांना माहीत आहे. दिलीप वळसे-पाटलांचीही चौकशी सुरू आहे. या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. तुम्ही जनतेला काहीही सांगितलं तरी हेच सत्य आहे. अजित पवार गट भाजपाबरोबर गेला नसता तर यातील काहीजण आता तुरुंगात असते. हसन मुश्रीफ तर १०० टक्के तुरुंगात गेले असते. दिलीप वळसे पाटलांची वेळही जवळ येत होती. प्रफुल पटेलांच्या गळ्यावर तर सतत टांगती तलवार आहे.”