महाराष्ट्रात सध्या हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवाय, मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी देखील अल्टिमेटम दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधलेला आहे. ”भाजपा त्यांचं काम हे ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ आणि ‘नवहिंदू ओवेसींच्या’ माध्यमातून करुन घेत आहे.” असं राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर, संजय राऊत यांनी या विधानात राज ठाकरेंना, ‘नवहिंदू ओवेसी’ आणि मनसेला ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ म्हटल्याचं सर्वत्र बोललं जात असताना, आता संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

मशिदींवरील भोंगे, ‘नवहिंदुत्ववादी’सह अयोध्या दौऱ्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा राज ठाकरे आणि भाजपावर निशाणा!

“मी कोणालाही व्यक्तिगत नाव घेऊन बोललेलो नाही. मी इतकच म्हणालो की, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने ज्या प्रकारे असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या एमआयएमचा वापर केला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात नवहिंदुत्ववादी जे ओवेसी आहेत. हिंदू समाजात देखील काही ओवेसी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, महाराष्ट्रात फूट पाडण्याचं, दंगली घडवण्याचं, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहे. महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरुक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढच मी सांगेन. देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. परंतु यशस्वी होणार नाहीत.” असं संजय राऊत यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

राम मंदिराच्या लढ्यामध्ये शिवसेना प्रत्यक्ष रणभूमीवर होती –

तसेच, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना अयोध्येच्या राम मंदिराच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष रणभूमीवर काम करत होती. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख साधरण तिकडची परिस्थिती काय हे पाहून आम्ही ठरवू. आमची काय राजकीय यात्रा नाही, आमची ही श्रद्धेची यात्रा आहे. राजकीय यात्रा असेल तर आम्ही तारीख ठरवतो आणि जाहीर करतो.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

कोविडमुळे वर्षभर आम्ही अयोध्येला जाऊ शकलो नाही –

याचबरोबर, “आमच्या मनात असं आलं की कोविड काळामुळे वर्षभरात आम्ही अयोध्येला जाऊ शकलो नाही. तेव्हा आदित्य ठाकरे आणि आमचे सगळे शिवसैनिक यांची इच्छा आहे, वर्षभरापासून आमची ही योजना सुरू आहे. परंतु कोविडमुळे आम्ही जाऊ शकलो नाही. काही बंधनं आमच्यावरती होती. काल,परवा आम्ही नाशिकला होतो आणि तिथले सगळे पदाधिकारी… कारण, रामनवमी आणि हनुमान जयंती ही नाशिकाल मोठ्याप्रमाणावर साजरी होते. ती सुद्धा एक अयोध्येप्रमाणे रामाची भूमी आहे. तेव्हा असं ठरलं की नाशिकच्या शिवसेनेने पुढाकार घ्यावा आणि आयोजन करावं, त्यानुसार त्यावर काम सुरू आहे.” असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

राऊत राज ठाकरेंना म्हणाले ‘नवहिंदू ओवैसी’; MNS ची MIM शी तुलना करत म्हणाले, “…मग खरे ओवैसी भोंगा प्रकरणात पडतील”

तर, “भाजपा त्यांचं काम हे ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ आणि ‘नवहिंदू ओवेसींच्या’ माध्यमातून करुन घेत आहे. भोंगे वाटप करुन मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी यासाठी कंत्राट दिलं आहे. ते मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवतील. मग खरे ओवेसी (असदुद्दीन ओवेसी) या प्रकरणामध्ये (भोंगा प्रकरणात) पडतील आणि साऱ्याचं रुपांतर दंगलींमध्ये होईल,” अशी भीती राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.

Story img Loader