लोकसत्ता वार्ताहर
राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानने दिनांक १० एप्रिल पासून साईबाबांच्या मुळ चर्म पादुका दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन हजार पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करणार आहे. आता या निर्णयाला शिर्डीतील काही ग्रामस्थांचा छुपा विरोध तर काहींचा उघड पाठिंबा आहे तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याविषयी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात साईबाबा संस्थानला दिनांक ७ एप्रिल पर्यंत आपले लेखी म्हणणे, शपथपत्र दाखल करण्याचे आदेश होऊन पुढील सुनावणी ७ एप्रिलला होणार आहे.
साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्सीय समितीने साईबाबांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता शेकडो वर्षांपूर्वीच्या बाबांच्या चर्मचरण पादुका भाविकांना दर्शनाकरिता तीन राज्यात घेऊन जाण्याचा ठराव घेऊन निर्णय घेतला आहे. साई संस्थान प्रशासनाने साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयटी विभाग, जनसंपर्क कार्यालय यांच्या मार्फत वेगवेगळ्या भाषेत आर्टिकल, व्हिडीओ तयार करून ते सर्व देशांमध्ये प्रसारित करण्याची गरज आहे मात्र तसे न करता केवळ श्रीमंत भक्त व काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क असलेल्या विविध राज्यातील खासगी ट्रस्ट यांच्याकडे या पादुका नेण्याचा घाट रचला आहे. परंतु या अनुषंगाने फक्त ठराविक भाविकांनाच या पादुकाच्या दर्शनाचा लाभ होणार असून यातून साई संस्थांनला नेमका कोणता फायदा होणार आहे? हे मात्र कोडेच आहे. कारण देश, विदेशात साईबाबांचे लाखो, करोडो भक्त आहेत त्यामुळे केवळ ठरविक राज्यात या पादुका नेऊन संस्थान नेमक्या किती भाविकांना याचे दर्शन देणार आहे. परंतु शंभर वर्षांहून जास्त कालावधीपासून जतन केलेल्या पादुका जर बाहेर नेण्यात येणार असल्या तरी त्याची सुरक्षा, पावित्र याचाही मोठा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात असा प्रकार कोणत्याही तीर्थस्थानी होत नाही मग शिर्डीतच का ? असा सवाल शिर्डी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी याच पादुका साईबाबांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने २०१८ मध्ये शताब्दी वर्ष म्हणून देश विदेशात नेण्यात आल्या होत्या मात्र अनेक देशांच्या विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव पादुका वेगवेगळे सुरक्षा रक्षक हताळत असल्याने त्याचे पावित्र भंगले होते. तरी सुद्धा त्याकाळी विश्वस्त मंडळाच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होऊनही त्यांनी सर्व नियम व अटी यांचा भंग करत विदेशी वारी करून पादुका नेण्यास सफल झाले. मात्र आता त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिर्डीतील काही ग्रामस्थांनी या पादुका बाहेरील राज्यात नेण्यास तीव्र विरोध केला. तर काही ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
आज शुक्रवारी साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याशी शिर्डी ग्रामस्थांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.या चर्चेत सकारात्मक निर्णय होत मागील झालेल्या चुका दुरुस्त करून पादुकाचे पावित्र जपले जाईल व कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत या पादुका नेल्या जातील असे आश्वासन गाडीलकर यांनी दिल्याने अखेर ग्रामस्थांनी पादुका नेण्यास सहमती दर्शविली. यावेळी रमेश गोंदकर, शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, कमलाकर कोते,प्रमोद गोंदकर, सचिन कोते, सचिन शिंदे, गोपीनाथ गोंदकर, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर, बाबासाहेब कोते, चेतन कोते आदी मान्यवर उपस्थित होते.
साईबाबा संस्थानला दिनांक ७ एप्रिल पर्यंत लेखी म्हणणे, शपथपत्र दाखल करण्याचे आदेश
साईबाबांच्या मुळ चर्म पादुका १०८ वर्षां पेक्षा जुन्या आहेत. मुळ पादुका प्रवासात खराब होऊ शकतात, पादुकाच्या वाहनाला अपघात होऊ शकतो, पादुका बदलल्या जाऊ शकता, मिरवणुकीत ऊन,वारा, पाऊस लागून चामडे खराब होऊ शकते अशा एक नव्हे अनेक समस्या निर्माण होऊन भ्रष्टाचार जन्माला येऊ शकतो म्हणून मुळ चर्म पादुका शिर्डी बाहेर नेण्यासाठी विरोध केला.दिनांक १० एप्रिल पासून पादुका भ्रमंतीचा कार्यक्रम साईबाबा संस्थाननने आखलेला आहे. यासंदर्भात संस्थान प्रशासन ऐकत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व संदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, दिवाणी अर्ज दाखल केला.याबात शनिवारी सुनावणी दरम्यान साईबाबा संस्थानला दिनांक ७ एप्रिल पर्यंत आपले लेखी म्हणणे, शपथपत्र दाखल करण्याचे आदेश होऊन पुढील सुनावणी ७ एप्रिलला होणार आहे.याचिका कर्तेच्या वतीने वकील प्रज्ञा तळेकर, वकील आजिंक्य काळे यांनी काम पाहिले.
असा असणार साई पादुका दौरा सोहळा
१० ते १३ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर व जिल्ह्यातील पेठ वडगाव, १४ ते १८ एप्रिल पर्यंत कर्नाटक राज्यातील , दावनगेरे , मल्लेश्वरम येथे सहा दिवस, १९ ते २६ एप्रिल पर्यंत तामिळनाडू राज्यातील , सेलम , करूर , पुलीयमपट्टी , धर्मापुरी येथे साईंच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार असून धर्मापुरी येथून २६ एप्रिल रोजी संध्याकाळी साईंच्या पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होणार आहे.