सांगली : शक्तिपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यातील काही गावांनी जरी पाठिंबा दिला असला तरी शासनाने अगोदर शेतकऱ्यांना किती मोबदला देणार हे जाहीर करावे. त्यानंतरच उर्वरित विरोध करणारी गावे आपली भूमिका जाहीर करतील. तसेच या मागणीसाठी १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी नागपूर महामार्ग आंकली येथे रोखण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी रेखांकन बदलण्यात येईल. काही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येतील, असे पत्रकार बैठकीत सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज विरोध असणाऱ्या गावांनी आपली भूमिका सौम्य करत अगोदर शासनाने मोबदला जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतरच उर्वरित विरोध करणारी गावे आपली भूमिका जाहीर करतील असे जाहीर करण्यात आले.
हेही वाचा…सांगलीत पावसाची हजेरी; द्राक्ष बागायतदारांना चिंता
यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, यशवंत हारुगडे, प्रवीण पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.