आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुळवड साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर भारतीयांबरोबर धुळवड साजरी केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षावर तिरकस टोलेबाजी केली. मागच्या काळात कुणीतरी आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
होळीच्या दिवशी सर्व शत्रूंना माफ केलं जातं, याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही विधानसभेत उभं राहून म्हटलं होतं की, खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला आहे. त्या सर्व लोकांचा आम्ही बदला घेऊ. आम्ही त्या सर्व लोकांना माफ केलं आहे, हाच आमचा बदला आहे. आम्ही आधीच माफ केलं आहे. आमच्या मनात काहीही कटुता नाही.”
हेही वाचा- बुरा ना मानो होली है! होळीच्या निमित्ताने सत्यजीत तांबेंचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले…
दरम्यान, विरोधी पक्षावर तिरकस टोलेबाजी करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे काही मित्र आहेत. त्यांना मागच्या काळात कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती. त्यानंतर काही दिवस त्यांचं जे काही चालंल होतं, ते पाहून मजा आली. कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडत होतं. पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, अशी नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा किंवा कामाचा नशा करावा.”
हेही वाचा- “शिमग्याला बोंब मारली असेल तर…”, सुषमा अंधारेंची रामदास कदमांवर टोलेबाजी!
“मला फक्त एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे. उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा साजरा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा साजरा केला जातो. पण आपल्याकडे काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. त्यांना मला एवढंच सांगायचंय की, एखाद्या दिवशी शिमगा ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी कुणाचंही नाव न घेता टोलेबाजी केली.