राज्यात सध्या विधानपरिषद आणि राज्यभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलचं तापलं आहे. विधानपरिषदेसाठी काल भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही, यावरून आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून याबाबत टिप्पणी केली, शिवाय माध्यमांशी बोलताना “कोणीतरी पडद्यामागून मुंडे-महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपावं अशाप्रकारचे प्रयत्न करतय का? ही शंका आहे.”असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या बातम्या आम्ही वाचतोय, त्या व्यथित करणाऱ्या असल्यानेच आम्ही हे विधान केलं –

संजय राऊत म्हणाले, “कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपाचा अंतर्गत विषय आहे. कोणीही असतील, मग खडसेंना द्यायचं की खडसेंना डावलायचं, पंकजा मुंडेंना द्यायचं की नाकारायचं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु मुंडे-महाजन यांचा शिवसेना-भाजपा युतीच्या २५ वर्षांच्या काळात आमचा फार जवळचा संबंध आला. या दोन नेत्यांमुळे महाराष्ट्रातील युतीला कायम बळ मिळत गेलं. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातील ज्या बातम्या आम्ही वाचतोय, त्या व्यथित करणाऱ्या असल्यानेच आम्ही हे विधान केलं.”

पंकजा मुंडे या देखील आपल्या वडिलांप्रमाणे बहुजन समाजाच्या नेत्या –

तसेच, “पंकजा मुंडे या देखील आपल्या वडिलांप्रमाणे बहुजन समाजाच्या नेत्या आहेत, ओबीसींच्या नेत्या आहेत आणि त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ज्या प्रकारचे पडसाद विविध क्षेत्रात उमटले. ते वाचल्यावर आणि पाहिल्यावर मला असं वाटलं की, कोणीतरी पडद्यामागून मुंडे-महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपावं अशाप्रकारचे प्रयत्न करतय का? ही शंका आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आजही मुंडे या नावाचा प्रभाव आणि पगडा आहे.” असं यावेळी संजय राऊतांनी यावेळी बोलून दाखवलं.

…त्यांना फक्त या महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करायचा आहे –

याचबरोबर, “भाजपाने राज्यसभेची सहावी किंवा सातवी जागा लढू द्या, त्यांना फक्त या महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करायचा आहे. पैशांचा खेळ करायचा आहे पण करू द्या, आमच्या कोट्यातील ज्या जागा आहेत महाविकासआघाडीच्या त्या आम्ही सर्वच्या सर्व जिंकू. त्यांची जी काय गणितं असतील ती त्यांच्या वही-पुस्तकात असतील, आमच्याही चोपड्या तयार आहेत.” असं म्हणत यावेळी संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका केली.

“मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की…”; शिवसेनेचा भाजपाच्या भूमिकेवरुन प्रश्न

“पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांना करावा लागला. मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर? याचा शोध घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या भाजपामधून मुंडे-महाजनांचे नामोनिशाण मिटवायचेच या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही,” असं शिवसेनेने म्हटलेलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Someones behind the scenes effort to remove munde mahajans name from the politics of the country sanjay raut raised doubts msr