अलिबाग : अशोक दुधे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या रायगड पोलीस अधीक्षक पदावर सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी संध्याकाळी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे स्वागत केले. सोमनाथ घार्गे हे यापूर्वी बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. जिल्ह्यात वाढणारी गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी घटनामध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. खून, महिलांवरील अत्याचार आणि चोऱ्या, घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. आर्थिक फसवणुकीच्या घटना जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात गेल्या काही महिन्यांत समोर आल्या आहेत. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत चालली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे अपघात, अलिबाग शहरामधील वाहतूक समस्या, मुरुड, श्रीवर्धन, सुधागड, रोहा तालुक्यातील अवैध दारूविक्री, मटका, जुगार यांसारख्या समस्या प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना पावले उचलावी लागणार आहेत.
जिल्ह्यात केमिकल तस्करी, डिझेल तस्करीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. टोळय़ांच्या माध्यमातून यांसारख्या गुन्हेगारी घटना सुरू असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील महिलांना अवैध दारूविक्रीविरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली होती. यामुळे गावठी दारूविक्रीचा मुद्दाही चव्हाटय़ावर आला होता. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर उतरून अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाईला व्यापक स्वरूप द्यावे लागणार आहे.
जिल्ह्यातील पोलीस वसाहतींची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना भाडय़ाच्या जागेत राहावे लागत आहे. पोलीस मुख्यालय असणाऱ्या अलिबागच्या वसाहतींचे प्रस्ताव बरीच वर्षे शासनदरबारी धूळ खात पडला आहे. हे प्रश्नही सोडविण्याच्या दृष्टीने नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना प्रयत्न करावे लागतील.