परभणी : पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाने दिलेले आश्वासन अमान्य केले असून आधी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, केवळ निलंबन आम्हास मान्य नाही अशी भूमिका सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी घेतली आहे. या प्रकरणात शिष्टाई करण्यासाठी आलेल्या आमदार सुरेश धस यांनी पोलिसांची पाठराखण करू नये अशीही टीका सोमनाथच्या कुटुंबीयांनी केली आहे.
येथील संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली तोडफोड आणि त्यानंतर उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान बंदला लागलेले हिंसक वळण या प्रकरणात चार पोलिसांना निलंबित करण्यात आले असले तरी पोलिसांचे हे निलंबन मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयास मान्य नाही. पोलिसांना केवळ निलंबित करू नये तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.
परभणीत १० डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांनी ज्या तरुणांना अटक केली त्या तरुणांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा समावेश होता. न्यायालयीन कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचे संतप्त पडसाद उमटले. त्याचबरोबर याच काळातल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पॅंथर नेते विजय वाकोडे यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दोन्ही कुटुंबीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणी ते मुंबई असा १७ जानेवारीपासून ‘लॉंग मार्च’ काढण्यात आला होता. परभणीहून निघालेला हा ‘लॉंग मार्च’ नाशिकपर्यंत आल्यानंतर राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर व आमदार सुरेश धस यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिले. या प्रकरणात चार पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती यावेळी धस यांनी दिली. दरम्यान प्रशासनाच्यावतीने आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले असून जर या आश्वासनाची पूर्तता एक महिन्याच्या आत झाली नाही तर पुन्हा नाशिकपासून ‘लॉंग मार्च’ काढण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या प्रकरणात कारवाई करताना पोलिसांचे नीतीधैर्य खचू नये असे मत आमदार धस यांनी व्यक्त केले होते. त्यावर सोमनाथच्या कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्ती जीवानिशी गेली आहे. सोमनाथला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर केवळ निलंबन करून चालणार नाही तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. धस यांनी पोलिसांची पाठराखण करू नये असे सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दरम्यान जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का ? असा सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केला आहे. जोपर्यंत सर्व दोषी पोलीस अधिकार्यांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विजयाबाई सुर्यवंशी म्हणाल्या की, तुम्ही आम्हाला मन मोठं करा म्हणता पण आमचं मन छोटंच आहे, आम्ही गुन्हेगारांना अजिबात माफ करणार नाही. तुमचं चुकीचं बोलणं सहन करणार नाही. माझ्या पोटचं लेकरू गेलंं आहे. माझं लेकरू परत आणून देऊ शकता का ? मी कोण्याही पोलिसाला माफ करणार नाही, त्यांना मोकळं सोडणार नाही.