Somnath Suryawanshi Mother परभणी जिल्ह्यात १० डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात विधानसभेत स्पष्टीकरण दिलं होतं.
राहुल गांधींनी घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट
आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. तसेच “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे. तर यानंतर सोमनाथच्या आईनेही माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने?
माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार करण्यात आलं. माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे प्राण घेतले. माझा मुलगा मेला त्यानंतर पाच दिवसांनी मला कळवलं. मला काहीही सांगितलं नव्हतं. मुलगा जिवंत असताना मला पोलिसांनी फोन केला नाही. मला सांगण्यात आलं की सोमनाथ हा तुमचा मुलगा त्याचा मृत्यू झाला आहे, त्याची बॉडी घेऊन जा. हे मला जे सांगितलं तेच आम्ही राहुल गांधींना सांगितलं. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही सोमनाथच्या आईने केली. आम्ही राहुल गांधींना आत्तापर्यंत काय घडलं ते सगळं सांगितलं. सोमनाथ सूर्यवंशी हृदय विकाराच्या झटक्याने गेला असं मुख्यमंत्री कसं काय म्हणू शकतात? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला असंही सूर्यवंशी कुटुंबाने विचारलं.
राहुल गांधी काय म्हणाले?
“सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांची आताच मी भेट घेतली. तसेच ज्या-ज्या लोकांना मारहण झाली, त्यांच्याशी मी बोललो आहे. सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांनी मला शवविच्छेदनाचा रिपोर्ट दाखवला. तसेच काही फोटो आणि व्हिडीओ देखील दाखवले. सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हा कोठडीत झालेला आहे. पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीची हत्या केली. मात्र, या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत खोटं बोलले. सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे म्हणून मारलं गेलं. सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचं रक्षण करत होता. ‘आरएसएस’ची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. आमची मागणी आहे की या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.