सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ याठिकाणी माणुसकीला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीनं जेवण न दिल्याच्या कारणातून आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं दगड आणि लोखंडी फुकणीने मारहाण करत आपल्या आईचा जीव घेतला आहे. हत्येची ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

राजाक्का ज्ञानू जाधव असं हत्या झालेल्या ७० वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे वास्तव्याला होत्या. तर दशरथ जाधव असं अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. आरोपी दशरथ आपल्या कुटुंबासह आगळगाव येथील पाटील मळ्यात राहत होता. त्याला दारुचं व्यसन होतं. तो दारुच्या नशेत अनेकदा आपल्या आईशी भांडण करायचा. तसेच तिला मारहाण देखील करायचा, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.

घटनेच्या दिवशी मृत राजाक्का यांनी आपला मुलगा दशरथ याला जेवण दिलं नव्हतं. जेवण न दिल्याच्या रागातून आरोपी मुलगा दशरथ याने आपल्या आईला दगड, विट आणि लोखंडी फुकणीनं अमानुष मारहाण केली. या मारहाणीत राजाक्का गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी मृत महिलेचा नातू गणेश भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. जेवण न दिल्याच्या कारणातून पोटच्या मुलाने जन्मदातीची निर्घृण हत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader