सोलापूर : अनैतिक संबंधाला विरोध केल्याने संतापलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केला. यात त्याची प्रेयसीही सामील झाली. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नुर गावात हा प्रकार घडला.

भीमाबाई हनुमंत कळसगोंड (वय ४८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा रमेश हनुमंत कळसगोंड (वय २९) यास या गुन्ह्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीविरुद्धही गुन्हा दाखल झाला असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या संदर्भात मृत भीमाबाई हिचे पती हनुमंत भागप्पा कळसगोंड (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा रमेश याचे त्यांच्याच गावातील एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. याबाबत रमेशच्या आई-वडिलांनी त्यास हा प्रकार थांबवण्यास सांगितले. यातूनच मुलासोबत त्यांचे वाद होत होते. अशाच एका भांडणावेळी रमेशने त्याच्या आईचा गळा आवळून खून केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

साडेआठ लाखांची घरफोडी

माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथे अनिता विजय माने यांच्या शेतातील घर फोडून चोरट्यांनी १७ तोळे सोन्याचे दागिने लांबविले. भरदुपारी ही घरफोडी झाली. माने कुटुंबीय घर बंद करून नातेवाईकडे गेले असताना इकडे चोरट्यांनी संधी साधून त्यांचे घर फोडले. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे निंगप्पा रामलिंग जवळे यांचे कुटुंबीय रात्री गावात महादेव यात्रा आणि काठीच्या मिरवणुकीत गेले असताना चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. यात सोन्याच्या दागिन्यांसह शेतात पेरणीसाठी ठेवलेले १०० किलो कांद्याचे बियाणे असा एकूण दोन लाख हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबविण्यात आला. वळसंग पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

ऑनलाइन जुगार अड्डा उद्ध्वस्त

सांगोला शहरातील धान्य बाजारात चालणारा बेकायदा ऑनलाइन जुगार अड्डा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या कारवाईत संगणक संचासह राऊटर, मोबाईल संच, रोख रक्कम आदी मिळून सुमारे दहा लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी असलेल्या परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांना सांगोला शहरातील बेकायदा ऑनलाइन जुगार अड्ड्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून तेथे छापा टाकला.

सिद्धिविनायक ऑनलाईन गेम सेंटरच्या नावाखाली चाललेल्या या जुगार अड्ड्यात ऑनलाइन आकडे टाकून लोकांना पैशाचे दाखवून ऑनलाइन प्ले विन नावाने जुगार सुरू होता. एका खोलीत फिरोज सिकंदर मुल्ला तर दुसऱ्या खोलीत ज्ञानेश्वर गायकवाड हे दोघे जुगार चालवत होते. त्यासाठी विजयसिंह पांडुरंग मिसाळ हा मदत करीत होता. त्यांच्यासह जुगार खेळणाऱ्या मंडळींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १२ संगणक संच, तीन राऊटर, ८ मोबाईल संच, दोन मोटारसायकली आणि ६३ हजार ८८५ रुपयांची रोकड असा एकूण नऊ लाख ९५ हजार १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.