आषाढी एकदशी म्हटलं की, डोळ्यासमोर येतं गजबजलेलं पंढरपूर. वारकऱ्यांच्या अलोट गर्दीनं भरून गेलेली चंद्रभागा. आसमंतापर्यंत पोहोचणार विठ्ठलाचा गजर… पण यंदा असं काहीच नाही. लेकुरवाळ्या विठू माऊलीची भक्तांसोबतची भेट यंदा चुकली. आषाढ वारीला करोनाची नजर लागली. त्यामुळे विठ्ठलाचा जयघोष करत जाणाऱ्या ज्ञानोबा, तुकाराम महाराजांच्या पालख्याही घाईत एसटीतून विठ्ठलाच्या भेटीला गेल्या. अशा वातावरणात एका वारकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट झाला आहे. पंढरपूरच्या वेशीवर पोहोचल्यानंतर पोलिसानं अडवलं आणि त्याच्यातच विठ्ठल पाहून वारकऱ्यानं हात जोडले. हा व्हिडीओ बघून अभिनेत्री कुलकर्णी यांच्याही डोळ्यात पाणी आलं.
सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी होत आहे. पण, दरवर्षीसारखा आनंद यंदा नाही. चंद्रभागेचा काठ अगदी निपचित पडला आहे. विठ्ठल मंदिर परिसरही सुनासुना आहे. यंदा लेकुरवाळा विठू माऊली यंदा भक्तांच्या भेटीविनाच राहिली. तरीही काही वारकरी लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी जाताना दिसले. पंढरपूरच्या वेशीवर जाऊन पोहोचलेल्या एका वारकऱ्याला पोलिसाने अडवले. त्यानंतर वारकऱ्यानं त्याच्यामध्येच विठ्ठल बघत, हात जोडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
हा व्हिडीओ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही बघितला. हे दृश्य बघून त्यांना रडू आलं. व्हिडीओ बघून त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. “मला रडूच आलं हा व्हिडीओ बघून… हा निर्मळपणा, भवतालाचा स्विकार, भक्तीतली शक्ती आणि ओतप्रोत भरलेली माया माऊली.. तुम्हाला साष्टांग प्रणिपात,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मला रडूच आलं हा व्हिडीओ बघून.. हा निर्मळपणा, भवतालाचा स्विकार, भक्तीतली शक्ती आणि ओतप्रोत भरलेली माया
माऊली.. तुम्हाला साष्टांग प्रणिपात https://t.co/IbcLvjRQk6— sonalikulkarni (@sonalikulkarni) July 1, 2020
करोनामुळे मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत यंदा आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारनं अगोदरच आवाहन केलं होतं. सरकारच्या आवाहनाला वारकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.