राज्यातील कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम राज्य सरकारकडून होत आहे. या कामांची माहिती देण्यासाठी आपण काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना नेहमीच भेटत असतो. त्यामुळे नेतृत्व बदलाची पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यपीठात झालेल्या खरीप आढावा बैठकीनंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यातील अन्य मंत्री, खासदार, आमदार हेही सोनिया गांधींना भेटून विविध कामांची माहिती देत असतात. राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे चालू असून, मला त्यांचे नेहमीच सकारात्मक मार्गदर्शन मिळत असते. मी ज्या दिवशी दिल्लीत कँाग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भेटलो, त्याच दिवशी मुंबईत राष्ट्रवादीने त्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. या घटनेचा आपल्या दौऱ्याशी बादरायण संबंध लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या भेटीचा चुकीचा अर्थ काढणे योग्य नाही.’’ राष्ट्रवादीच्या संभाव्य राजकीय हालचालींबाबत बोलताना, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असे सांगून त्यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा