भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरमध्ये संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं आहे. “मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं ते म्हणाले आहेत. तेली समाजाचा हा कार्यक्रम होता आणि यासाठी मोठ्यासंख्येने ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा अर्थ सोपा आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी एक सभेत सांगितलं होतं, की देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं एक वक्तव्यं होतं, आज बावनकुळेंचं वक्तव्य समोर आलं आहे. हे जाऊ द्या स्वत: एकनाथ शिंदेंचं काही दिवसांपूर्वी बोलले होते की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ स्पष्ट आहे , एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपाला शरण गेला आहे आणि भाजपाच्या मनात जे आहे की देवेंद्र फडणवीसांनीच नेतृत्व करावं, याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. चंद्रशेखऱ बावनकुळेंचं वक्तव्याचा गांभीर्याने विचार शिंदे गटाने आणि महाराष्ट्राने केला पाहिजे. एबीपी माझाशी मिटकरी बोलत होते.”

हेही वाचा – “यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर…” सचिन सावंतांचा चंद्रकांत पाटलांना टोला!

याशिवाय “उद्या नागपुरात अधिवेशन असताना आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य याचा अर्थ स्पष्ट आहे, की त्यांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य नाही आणि लवकरच एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचा राजकीय गेम करून, देवेद्र फडणवीसांना ते परत त्या ठिकाणी सत्तारूढ करण्यासाठी आसूसलेले आहेत.” असंही मिटकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींशी आमचे वैचारिक मतभेद असले, तरी…” रोहित पवारांचं विधान!

याचबरोबर, “मी कालही सांगितलं की ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या दिवशी हे सरकार कोसळलेलं दिसेल. आता त्याची ठिणगी कालपासून पडली, संजय राऊतांनी सांगितलं होतं की फेब्रुवारी महिना हे सरकार पाहणार नाही. त्या दिशेनेच ते जातय आणि काल देवेंद्र फडणवीसही बोलले होते की लवकरच आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात… आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व म्हणत आहेत, परंतु त्यांच्या पोटात काय हे बावनकुळे म्हटले आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना अजूनही मान्यता मिळाली नाही हे त्यावरून स्पष्ट होतं. पण सद्यस्थितीत चंद्रशेखर बावकुळेंनी इतकं तरी कबूल करावं, एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आहे. आगामी काळात आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काम करू, असं तरी त्यांनी म्हटलं पाहिजे. सध्याची वस्तूस्थिती स्वीकारायला पाहिजे पण यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकरेलेलं नाही, हे यावरून स्पष्ट होतय.” असं मिटकरींनी सांगितलं.