दलितांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी, आचारसंहिता संपल्यानंतर राज्यातील सहाही विभागाच्या ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज खर्डा (ता. जामखेड) येथे केली
खर्डा येथे आठवडय़ापूर्वी नितीन राजू आगे या दलित समाजातील होतकरू युवकाचा खून गावातीलच उच्चवर्णीयांकडून करण्यात आला. पाटील यांनी आज, मंगळवारी आगे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच हत्येचा निषेध व घटनेचा तीव्र शब्दांत धिक्कारही केला. त्यानंतर त्यांनी विशेष न्यायालये स्थापन केली जाणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, पंचायत समिती सदस्य विजय गोलेकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
पाटील यांचा आजचा दौरा ऐनवेळी आयोजित करण्यात आला होता. पक्षाच्या पदाधिका-यांनाही आज सकाळी माहिती मिळाली. खर्डा येथे आल्यावर पाटील यांनी मृत नितीनच्या आईवडिलांशी, त्यांच्या राहत्या घरात, पत्र्याच्या शेडमध्ये स्वतंत्रपणे चर्चा केली. पोलीस तपास, प्रशासनाकडून काही त्रास होत आहे का, याची माहिती त्यांनी आगे कुटुंबाकडून घेतली. पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावात दलितांना काही त्रास होत आहे का, अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत का, पोलीस तपास योग्य पद्धतीने होत आहे का, याची माहिती घेतली. नितीनला गरम सळईने चटके दिल्याच्या तक्रारीबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षकांना जाहीरपणे विचारणा केली, त्यावर शिंदे यांनी शवविच्छेदन अहवालात तसे नमूद नसल्याचे सांगितले. तपासाबाबत तक्रार असल्यास अन्य यंत्रणांकडे सोपवला जाईल, असे ते म्हणाले, मात्र ग्रामस्थांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केले.
पोलीस तपासात कोणताही हस्तक्षेप होणार नाही व तपास निष्पक्ष होईल, ग्रामस्थांनी गावात जातीय सलोखा ठेवावा, असे आवाहन पाटील यांनी केले. घटनेचा तपास तज्ज्ञ अधिका-यांकडे सोपवण्याची सूचना त्यांनी शिंदे यांना केली. सन २००९ नंतर दलित अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली आहे, यासाठी आपण स्वत: नगरमध्ये अधिका-यांसमवेत बैठक घेऊ, असेही पाटील यांनी सांगितले. खटला जलदगती न्यायालयापुढे चालवला जाणार असल्याचे व सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार असल्याचा पुनरुच्चा त्यांनी केला.
राजेंद्र कोठारी व विजय गोलेकर यांनी खर्डा येथे पोलीस स्टेशन होण्याच्या मागणीचे निवेदन दिले. आचारसंहितेनंतर याबाबत आपण निर्णय घेऊ, असे पाटील यांनी सांगितले.

Story img Loader