आठ दिवसांत क्विंटलमागे पाचशे रुपयांनी वाढ, बाजरीची आवकही घटली
दिगंबर शिंदे, सांगली</strong>
कधीकाळी गरिबांच्या ताटातली आणि सध्या आरोग्य जागृतीमुळे श्रीमंतांच्या आहारातली ज्वारी यंदा अन्नाला महाग होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाअभावी रब्बी ज्वारीचे उत्पादन करणाऱ्या सोलापूर, सांगली या मुख्य पट्टय़ात ९० टक्के पेरण्या झालेल्या नाहीत. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची लक्षणे असून यामुळे बाजारातील ज्वारीची आवकही आतापासून रोडावू लागली आहे. परिणामस्वरूप गेल्या आठ दिवसांत ज्वारीचे दर क्विंटलला पाचशे रुपयांनी वाढले आहेत. ज्वारीबरोबरच खरिपातील बाजरीचे पीकही यंदा बहुतांश ठिकाणी हातचे गेल्याने बाजारात बाजरीची आवकही मोठय़ा प्रमाणात घटली आहे.
सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची (शाळू) पेरणी मोठय़ा प्रमाणात केली जाते. मात्र, गेली दोन महिने पावसाने पाठ फिरवल्याने पावसाच्या पाण्यावर होणारी ही पेरणीच झालेली नाही. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, बार्शी परिसरात हे रब्बी हंगामातील शाळूचे पीक घेतले जाते. यंदा पावसाने निराशा केल्याने या पेरण्याच झालेल्या नाहीत. सांगली जिल्ह्यात तर अवघ्या ६ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.त्यामुळे बाजारात सध्या ज्वारीची आवक बंद झाली आहे.
अनेक शेतकरी मागील हंगामात उत्पादित केलेली शाळू, बाजरी दिवाळीच्या तोंडावर विक्रीसाठी बाजारात आणतात. मात्र, यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार आणि त्यामुळे भाव भडकणार याचा अंदाज आल्याने शेतक ऱ्यांनी ही साठवलेली ज्वारीही बाजारात आणण्याचे बंद केले आहे. यामुळे हे भाव भडकू लागल्याचे बाजार समितीचे प्रभारी सचिव एम. एम. हुल्याळकर यांनी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी सांगली बाजारामध्ये एकवीसशे ते पावणेतीन हजार रुपये क्विंटलने मिळणारी ज्वारी एकदम क्विंटलमागे ५०० रुपयांनी महाग झाली आहे. मंगळवारी सांगली बाजारामध्ये केवळ १३२ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी सौद्यामध्ये अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये असा दर मिळाला.
दरम्यान खरिपातील बाजरीचे पीकही बहुतांश ठिकाणी हातचे गेल्याने या पिकाची आवकही मोठय़ा प्रमाणात घटली आहे. तीन महिन्यात पिकणारी बाजरी दसरा-दिवाळीला बाजारात येते. मात्र, यंदा पावसाअभावी उत्पादनात प्रचंड घट आल्याने नवीन बाजरीच बाजारात आलेली नाही. पंधरा दिवसांपूर्वी १ हजार ५७३ रुपये क्विंटलमागे असलेला बाजरीचा सरासरी दर आज २ हजार २५ रूपयांवर गेला आहे.
दर आणखी वाढण्याची भीती
यंदाच्या दुष्काळाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी राखून ठेवलेला शाळू, बाजरी बाजारात आणणे बंद केले आहे. यामुळे दरातही अनैसर्गिकरित्या वाढ झाली आहे. दिवाळीनंतर हे दर आणखी भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
– विवेक शेटे, व्यापारी, सांगली