दिवाळी सण तोंडावर आला आहे. करोना विषाणूच्या साथीनंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधाशिवाय दिवाळी साजरी केली जाणार आहे. सध्या करोना विषाणूचं संकट दूर झालं असलं तरी महागाईनं मात्र सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. ऐन दिवाळीत गहू आणि ज्वारीच्या किमती गगनाला भिडत आहेत. यामुळे यंदाही सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता कमी आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असून याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊस, इंधनांचे वाढते दर आणि साठेबाजीमुळे ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.
गेल्या वर्षी एपीएमसीमधील घाऊक बाजारात ज्वारीचा दर २१ ते ३९ रुपये प्रति किलो इतका होता. आता हाच दर २८ ते ४५ रुपये प्रति किलो झाला आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी बाजरीला १८ ते २५ रुपये प्रति किलो दर मिळत होता. आता बाजरीसाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. सध्या बाजरीचा दर २४ ते ३५ रुपये प्रतिकिलो इतका आहे.
तांदळाच्या बाबतीतही सारखीच स्थिती आहे. गेल्या वर्षी तांदळाला ३० ते ४२ रुपये प्रति किलो दर मिळत होता. सध्या तांदळाचे दर २९ ते ४६ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात अनुक्रमे ७, ६ आणि ४ रुपयांनी वाढ झाली आहे.