‘शाहू, फुले, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, ‘लाज नाही, शरम नाही, खुन्याच्या पत्ता नाही’ अशा घोषणांनी शहर बुधवारी दणाणून गेले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष उलटूनही मारेकऱ्यांचा तपास करण्यात अपयशी ठरलेल्या शासन यंत्रणेच्या विरोधात अंनिसचे कार्यकत्रे बुधवारी रस्त्यावर उतरले. मोर्चा, धरणे आंदोलन व मानवी साखळीच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखेच्या वतीने शहरात मोर्चा, धरणे आंदोलन व मानवी साखळीचे आयोजन केले होते.
डॉ. दाभोलकरांचा भरदिवसा सनातनी प्रवृत्तींकडून खून झाला. त्याला बुधवारी वर्ष झाले. तपास यंत्रणा खुनाचे सूत्रधार व मारेकरी यांच्यापर्यंत अजून पोहोचली नाही. उलट प्लँचेटचा वापर करून राज्याची उरलीसुरली अब्रू वेशीवर टांगली. अघोरी अमानुष अंधश्रद्धांना विरोध व विवेकी जगण्यासाठी विधायक हस्तक्षेप करताना दाभोलकर यांची हत्या झाली. खुनाच्या तपासातील विलंबामुळे कार्यकत्रे व सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता, उद्वेगाची भावना निर्माण झाली. त्याचाच भाग म्हणून १० राज्ये व महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून निषेध नोंदविला जात आहे.
सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून आंबेडकर चौकातून ‘दाभोलकर अमर रहे’च्या घोषणा देत मोर्चा निघाला. त्यानंतर छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विवेकी कृती करणाऱ्यांना समाज वेठीस धरत असेल, तर अशा कृती हजार वेळा करू, असा संदेशही घोषणांमधून देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात देऊन मानवी साखळी तयार केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अंनिस जिल्हाध्यक्ष शैलजा भस्मे, कार्याध्यक्ष किरण सगर, एस. के. िशदे, प्रा. महेश मोटे, उस्मानाबाद शाखाध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, सचिव बालाजी तांबे, राज कुलकर्णी, अॅड. देविदास वडगावकर, शरयू टेपाळे, अनुपमा भागवत, कमल नलावडे, अवंती सगर, डॉ. सुभाष वाघ, प्रा. भालचंद्र जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, महेश पोतदार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. डी. कुंभार, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे, मसाप कार्याध्यक्ष राजेंद्र अत्रे आदींसह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
‘आम्ही सारे दाभोलकर’चा गजर
‘शाहू, फुले, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, ‘लाज नाही, शरम नाही, खुन्याच्या पत्ता नाही’ अशा घोषणांनी शहर बुधवारी दणाणून गेले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष उलटूनही मारेकऱ्यांचा तपास करण्यात अपयशी ठरलेल्या शासन यंत्रणेच्या विरोधात अंनिसचे कार्यकत्रे बुधवारी रस्त्यावर उतरले.
First published on: 21-08-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound of we are all narendra dabholkar