सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात मृगाच्या पावसाने चांगली साथ दिल्यामुळे सरासरीच्या जवळपास तिप्पट प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली होती. पुरेशा पावसामुळे बहरलेल्या सोयाबीनमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असताना पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः बार्शी तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र ४७ हजार ६७ हेक्टर होते. पोषक पाऊसमानामुळे बार्शीसह दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आदी तालुक्यांत सोयाबीनची लागवड सुमारे एक लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणात झाली. एकट्या बार्शी तालुक्यात ८८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पेरा झालेले सोयाबीन बहरले आहे. जून-जुलैच्या सुरुवातीला लागवड केलेले सोयाबीनच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

तथापि, शेतात पोषक वाढलेल्या आणि काढलेला सोयाबीनला दृष्ट लागली असून गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. काढणीला आलेले सोयाबीन जास्त पावसामुळे काळे पडत असल्याने आणि गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा दिसून येत आहे.

हेही वाचा >>>परवानगी नाकारूनही रोहित पवार यांनी केले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

सोलापूर जिल्हा मुळात रब्बी हंगामाचा आहे. सध्या उत्तरा नक्षत्राच्या पावसाचा जोर कायम असताना पुढे हस्त नक्षत्राचाही पाऊस तेवढ्याच जोरदारपणे पडण्याची शक्यता आहे. दसरा- दिवाळीपर्यंत पाऊस होतो. या जास्तीच्या पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसत असून, पावसाचे सातत्य राहिल्यास एकट्या बार्शी तालुक्यात सुमारे ४० टक्के सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती शेतीचे अभ्यासक प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

बार्शी येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी सुशेन डमरे यांनी आपल्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत असल्याने शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.