‘हिंदुस्थान अॅन्टीबॉयेटिक, एलआयसी सारख्या कंपन्या विकल्या जात आहेत. सरकारी नोकऱ्या संपवून तरुणांना करार पद्धतीच्या नोकऱ्यांमध्ये जुंपले जात आहे. अदानी आणि अंबानी यांचे हित साधण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. भाजपा सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केलेले नाही. कुठल्याही मालमत्ता उभ्या केल्या नाहीत, जे आहे ते विकण्याचा सपाटा लावला आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. ते अमरावतीत बोलत होते.
“एका नटवरलालने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची खोट्या सह्या करुन बिहारचे रेल्वे स्टेशन, ताजमहल, लाल किल्ला आणि सरकारी जमिनी विकल्या होत्या. आजही पुन्हा एक नटवरलाल देश विकू पाहतोय. हे देश चालवण्यासाठी आले होते, पण देशाला पोखरून टाकत आहेत,” अशी टीकाही अबू आझमी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली.
हेही वाचा : “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य
देशातील सरकारी कंपन्या विकण्याची मोहीमच केंद्र सरकारने उघडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोन गुजराती या कंपन्या विकताहेत, तर अदानी व अंबानी हे दोन गुजराती त्या खरेदी करताहेत. खासगीकरणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या घालवण्याचे काम केले जात आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अदानी तर रेल्वे देखील खरेदी करायला निघाले आहेत. देशाला उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे, असा हल्लाबोलही अबू आझमी यांनी केला आहे.