Abu Azmi On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या सुनील शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान, यावरून मनसेचे नेते आक्रमक झाले असून सुनील शुक्ला यांना प्रत्युत्तर देत आहेत.
राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरील कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावरूनच चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या वादात आता समाजवादी पार्टीचे नेते तथा आमदार अबू आझमी यांनी उडी घेतली आहे. मनसेबाबत जी मागणी याचिकेत करण्यात आली आहे ती योग्य असल्याचं आमदार आझमी यांनी म्हटलं आहे. तसेच उत्तर भारतीयांना अपमानित केलं जात असून मनसेवर निर्बंध लादले पाहिजेत, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.
अबू आझमी काय म्हणाले?
“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की, एका समुदायाचे लोक जे खूप कष्ट करतात. आता त्याच उत्तर भारतीयांना शिव्या दिल्या जातात आणि सरकार गप्प आहे? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा उत्तर प्रदेशातील नेते बोलवले जातात आणि उत्तर भारतीय मतदान आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता उत्तर भारतीयांना अपमानित केलं जातंय आणि सरकार काहीही बोलत नाही? ज्यांनी कोणी मनसेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ते योग्य आहे. अशा लोकांवर (मनसेवर) निर्बंध लादलेच पाहिजेत, जे मराठी आणि उत्तर भारतीय नावावरून लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केलं होतं. तसेच राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना (पक्ष कार्यकर्त्यांना) दिले होते. त्यानुसार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. काही वेळा हिंसक आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी मराठीला विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या कानशीलात लगावल्या. मनसेच्या या आंदोलनानंतर उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.
मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे त्यांनी केली आहे. “राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी”, असं शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.